पालिकेच्या रस्ते आणि मलनिस्सारण विभागातर्फे सुरू असलेल्या खोदकामाचा फटका बसून नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारतीजवळ १८ इंच व्यासाची जलवाहिनी फुटली आणि पाण्याची कारंजी उडू लागली. जलवाहिनीतील हजारो लिटर पाणी वाहून गेले.
 रस्त्यावर पसरलेल्या पाण्यामुळे अपघात होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पालिकेच्या जलविभागाच्या अधिकाऱ्यांनीही धाव घेत जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. नरिमन पॉइंट येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मार्गावरील एअर इंडिया इमारतीजवळ गेल्या काही दिवसांपासून रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचबरोबर मलनिस्सारण वाहिन्यांची कामेही करण्यात येत आहेत. बुधवारी रात्री येथे खोदकाम सुरू असताना रस्त्याखालून गेलेल्या जलवाहिनीला धक्का बसला आणि ती फुटली. मात्र त्या वेळी ही बाब लक्षात आली नाही. गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास नरिमन पॉइंट परिसराचा पाणीपुरवठा सुरू झाला आणि फुटलेल्या जलवाहिनीतून पाण्याची कारंजी उडू लागली. परिणामी, या परिसरात पाणीच पाणी झाले. त्यामुळे काही काळ वाहतुकीस अडथळाही निर्माण झाला.
जलवाहिनी फुटल्यानंतर मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यातील अधिकारी, वाहतूक पोलीस आणि पालिकेच्या जलविभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. तर जलविभागाच्या अधिकाऱ्यांनी फुटलेल्या जलवाहिनीची पाहणी करून दुरुस्तीसाठी कर्मचाऱ्यांची कुमक मागविली.
परिसरातील नागरिकांना पाणी मिळावे यासाठी दुपारी १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरूच ठेवण्यात आला होता. मात्र फुटलेल्या जलवाहिनीतून हजारो लिटर पाणी वाहून गेले. त्यानंतर पाणीपुरवठा खंडित करून जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले होते. दुरुस्तीचे काम गुरुवारी पूर्ण होऊन शुक्रवारी या परिसरातील पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असे जलविभागातील अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

Story img Loader