उरणच्या पिरवाडी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. अशा वेळी पर्यटकांसाठी आकर्षण ठरणाऱ्या व मुंबईप्रमाणेच उरण आणि नवी मुंबईच्या गळ्यातील रत्नहार ठरलेल्या पिरवाडीचा समुद्रकिनारा सध्या प्लास्टिकच्या कचऱ्याने वेढला गेल्याने पर्यटकांच्या आनंदावर विरजन पडले आहे. यापूर्वीच महाकाय लांटानी किनारा उद्ध्वस्त केला असताना आता पिरवाडी किनाऱ्याला या कचऱ्याच्या नव्या संकटाला सामोर जावे लागत आहे.
पर्यटन आणि पर्यटन व्यवसाय वाढीस लागला असताना नवी मुंबई परिसरात उरणचा पिरवाडी समुद्रकिनारा पर्यटनस्थळ म्हणून आता आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. त्यामुळे या किनाऱ्यावर दररोज हजारो पर्यटक हजेरी लावत आहेत. किनाऱ्यावर फिरताना किनारा स्वच्छ असावा अशी माफक अपेक्षा पर्यटकांची असते. परंतु त्याबाबतीत पिरवाडी समुद्रकिनारा पर्यटकांची निराशा करीत आहे. किनाऱ्यावर  लाटांसोबत वाहून येणारा प्लास्टिकमिश्रित कचरा आणि घाणीमुळे पर्यटकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. किनाऱ्यावर तेल तवंग येणे, महाकाय लाटांमुळे किनाऱ्याची धूप आदी समस्यांमुळे किनाऱ्याची हाणी झाली आहेच. त्यातच २००७ मध्ये मुंबई व जेएनपीटी बंदराच्या दरम्यान चित्रा व खलिजा या दोन मालवाहू जहाजांची टक्कर होऊन झालेल्या अपघातानंतर काही कंटेनर पिरवाडीच्या समुद्रकिनाऱ्यावर आले होते. त्यातील प्लास्टिकचा कचरा आठ वर्षांनंतर आजही या किनाऱ्यावर ठाण मांडून असून पावसाळ्यातील जोरदार लाटांमुळे वाळू वाहून गेल्याने कचरा किनाऱ्यावर तरंगू लागला आहे.  काही प्रमाणात प्रशासन तसेच सामाजिक संस्थांनी प्रयत्न करून कचरा साफ करण्याचा प्रयत्न केला असला तरी तो पूर्ण यशस्वी न झाल्याने आजही हा कचरा कायम आहे.
जेएनपीटी व मुंबई बंदरात येणाऱ्या जहाजातून तसेच किनाऱ्यावरील शहरातील कचरा समुद्रात टाकला जातो. हा कचरा समुद्रात न राहता भरतीच्या लाटांबरोबर पुन्हा किनाऱ्यावरच येतो. त्यामुळे मुंबईतही नरिमन पॉइंटसारख्या ठिकाणी समुद्राच्या भरतीच्या वेळी कचरा आलेला होता. त्याचप्रमाणे याच किनाऱ्यावर जहाजांच्या दिशादर्शक म्हणून वापरण्यात येणाऱ्या धूम्रकांडय़ाही किनाऱ्यावर लागल्याने घबराहट निर्माण झाली होती.त्यामुळे समुद्रात कचरा टाकल्याने कचऱ्याची विल्हेवाट लागत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पिरवाडी समुद्रकिनाऱ्यावरील कचरा महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड तसेच प्रशासनाने साफ करून पिरवाडीच्या पर्यटकांना दिलासा द्यावा, अशी मागणी उरण पंचायत समितीच्या सदस्य माया काका पाटील यांनी केली आहे.यासंदर्भात उरणचे नायब तहसीलदार रवींद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता याची माहिती महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाला देण्यात आली आहे. त्यांना येथे स्वच्छता करण्याचे आदेश देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
जगदीश तांडेल, उरण

Story img Loader