सोलापूर जिल्ह्य़ातील दुष्काळाची भीषण स्थिती लक्षात घेऊन उजनी धरणात पुणे जिल्ह्य़ातून पाणी सोडण्याची मागणी होत असली तरी त्यास राष्ट्रवादीची नेते मंडळी ठाम विरोध करून कोलदांडा घालत आहेत. त्यामुळे या प्रश्नावर अण्णा हजारेप्रणीत भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे ज्येष्ठ कार्यकर्ते शंकरराव साठे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यासाठी धाव घेतली आहे.
महाराष्ट्र राज्य जलस्रोत नियामक मंडळ कायदा २००५ प्रमाणे अंमलबजावणी न करता प्रचंड राजकीय दबावाखाली येऊन उजनी धरणाच्या वरील धरणातून पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे उजनीतील पाण्याची पातळी वजा पंधरा टक्क्य़ांपर्यंत खाली आल्याचे साठे यांनी सांगितले.
यंदाच्या वर्षी सोलापूर जिल्ह्य़ातील जनता दुष्काळामुळे होरपळत आहे. या जिल्ह्य़ाची भाग्यदायिनी समजल्या जाणाऱ्या उजनी धरणातील पाण्याचा साठाही चुकीच्या नियोजनामुळे संपुष्टात आला आहे. सोलापूर शहराला पिण्यासाठी राखून ठेवलेल्या २४ टीएमसीपैकी जेमतेम ९ टीएमसी एवढेच पाणी मिळाले आहे. उर्वरित पाणी हक्काचे असूनही मिळत नाही. माणसांना पिण्याचे पाणी, जनावरांना पिण्यासाठी, चाऱ्यासाठी पाणी, शेती, मत्स्य व्यवसाय, उद्योग अशा सर्वच बाजूंनी जिल्ह्य़ाला दुष्काळाचा भयानक फटका बसला आहे. यात कोटय़वधींचे नव्हे तर अब्जावधींचे नुकसान सहन करावे लागत आहे.
हळूहळू कडक उन्हाळा जाणवत असताना दुष्काळी स्थिती अधिक गंभीर बनत आहे. येत्या काही दिवसात पाणी प्रश्न मार्गी न लागल्यास अनेक कुटुंबीयांना स्थलांतर करण्याची पाळी येण्याची शक्यता असल्याचे शंकरराव साठे यांनी सांगितले. या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी पुणे जिल्ह्य़ातून उजनी धरणात पाणी सोडणे हाच एकमेव उपाय असल्याचे त्यांनी नमूद करीत, त्यासंदर्भात आपण उच्च न्यायालयात अ‍ॅड. महादेव चौधरी यांच्यामार्फत धाव घेतल्याचे सांगितले.