केंद्रीय कोळसा, ऊर्जा व अक्षय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल यांनी नुकताच वेकोलिला भेट दिली. या भेटीत त्यांनी वेकोलिच्या योजनांचा आढावा घेतला. यावेळी वेकोलिचे अध्यक्ष व व्यवस्थपाकीय संचालक ओम प्रकाश, कार्मिक संचालक रूपक दयाल, तांत्रिक संचालक एस.एस. मल्ही, महाजनकोचे अध्यक्ष आशिष शर्मा यांच्यासह वेकोलिच्या विविध क्षेत्रांचे महाव्यवस्थापक आणि मुख्यालयातील विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
या बैठकीत वेकोलिच्या सध्याच्या कार्याची तसेच भविष्यातील योजनांची माहिती गोयल यांना देण्यात आली. कोळसा उत्पादन, वित्तीय व्यवस्थापनासोबतच विश्वासार्हता आणि सातत्याला अधिक महत्त्व देण्याची आवश्यकता आहे. भविष्यात वेकोलिमध्ये संशोधन, विकास, कोळशाची गुणवत्ता, खाणींचे यांत्रिकीकरण आणि नवीन योजनांचा शुभारंभ अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कोळसा मंत्रालय वेकोलिच्या नवीन खाणींच्या आर्थिक, पर्यावरण व वन यासंबंधीच्या परवानगीबाबत मदत करेल, असे आश्वासन गोयल यांनी बैठकीत दिले. कोळसा उद्योगाताील अधिकाऱ्यांनी कोळसा उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावे, देशाच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक असलेल्या वीज निर्मितीसाठी कोळशाची मागणी पूर्ण करण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी कोळसा उद्योगाने सक्षम राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Story img Loader