उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मांडलेल्या राज्यात स्वतंत्र पर्यटन एमआयडीसीच्या संकल्पनेचे विदर्भात स्वागत झाले आहे. विदर्भातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, आनंदवन, महाकाली व मरकडा मंदिर, भद्रावतीच्या ऐतिहासिकगुंफा व जैन मंदिर, सोमनाथ व परिसरातील पर्यटन स्थळे तसेच अमरावती जिल्ह्य़ातील चिखलदरा, बघता या तसेच लगतच्या गडचिरोली जिल्हय़ात पर्यटन एमआयडीसीला मोठय़ा प्रमाणात वाव आहे. त्या दृष्टीने प्रयत्न केल्यास पर्यटनासोबतच रोजगारात वाढ होऊ शकते. परंतु, याची धोरणात्मक अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया पर्यटनाशी संबंधित मान्यवरांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.
स्वतंत्र पर्यटन एमआयडीसीचे ज्येष्ठ पर्यटन अभ्यासक चंद्रपाल चौकसे यांनी स्वागत केले. एकाच छत्राखाली सर्व सुविधा मिळण्याची व्यवस्था जर सरकारमार्फत होत असेल तर पर्यटकांच्या दृष्टीने सोयीचे राहणार आहे. पर्यटन स्थळानजीकच्या जागे प्लॉट पाडून सरकारी विश्रामगृहे बांधणे, पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देणे जर होणार असेल तर पर्यटनवाढीच्या दृष्टीने मोठा वाव मिळेल. यासाठी तज्ज्ञांची बैठक धोरण निश्चित करण्यात आले पाहिजे, असेही चौकसे यांनी सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्य़ातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. पर्यटकांच्या राहण्यासाठी येथे हॉटेल्स, मोटल्स, फार्म हाऊस व एमटीडीसीचे विश्रामगृह आहे, मात्र तरीही पाहिजे तसा पर्यटन उद्योग येथे विकसित झालेला नाही. पर्यटन उद्योगावर आधारित एमआयडीसी येथे विकसित केली तर त्याला निश्चितच चांगला प्रतिसाद मिळेल, अशी प्रतिक्रिया चंद्रपूर एमआयडीसीचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा यांनी व्यक्त
केली.
केवळ ताडोबा प्रकल्पच नाही, तर जुनोना तलाव व इरई डॅम, आनंदवन, महाकाली व मरकडा मंदिर, भद्रावतीच्या ऐतिहासिक गुंफाही या जिल्ह्य़ात आहेत. पर्यटक एकदा येथे आला की, त्याला जिल्ह्य़ातील सर्व पर्यटनस्थळांचे दर्शन घडवायचे. त्या निमित्ताने पर्यटनावर आधारित उद्योग जसे हॉटेल्स, मॉटेल्स, टूर अॅन्ड ट्रॅव्हल्स, धाबे, जिप्सी व याच्याशी संबंधित अनेक बाबी उपलब्ध करून द्यायच्या, असेही ते म्हणाले.
विदेशी पर्यटक संख्येने अधिक येत असल्याने अतिशय चांगले पर्यटन केंद्र विकसित होऊ शकते, मात्र राज्य शासनाने ही बाब तेवढय़ाच गांभीर्याने घेण्याची गरज आहे. चारगाव धरण, रामदेगी, सोमनाथ, भद्रावतीचे जैन मंदिर, बीरशाहची समाधी व इतर अनेक पर्यटन स्थळ आहेत. त्या दिशेने या सर्वाचा विकास केला, तर पर्यटन एमआयडीसी निश्चित यशस्वी होईल, अशी प्रतिक्रिया हाय फ्लाय अॅश प्रा.लि.चे अध्यक्ष प्रवीण जानी यांनी व्यक्त केली.
सीएसी ऑलराऊंडरचे अमोल खंते म्हणाले, स्वतंत्र पर्यटन एमआयडीसीच्या प्रभावी अंमलाने पर्यटन विकास निश्चितपणे होईल. खरेतर राज्याने २००६च्या पर्यटन धोरणाची अजूनही अंमबजावणी केलेली नाही, हे दुर्दैव आहे. स्वतंत्र पर्यटन एमआयडीसीच्या निमित्ताने पर्यटकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणारा एक पट्टा तयार होईल, सर्व सुविधा एकाच छत्राखाली मिळतील ही अत्यंत चांगली बाब
आहे.
गडचिरोलीत पर्यटन उद्योगाला चांगले दिवस असल्याची प्रतिक्रिया जलबिरादरीचे संयोजक संजय वैद्य यांनी व्यक्त केली. गडचिरोलीतील नक्षलवाद ही समस्या सोडली तर निसर्गरम्य भामरागड, सिरोंचा, हेमलकसातील लोकबिरादरी प्रकल्प, मरकडा, प्राणहिता व वैनगंगा नदी, तसेच आंध्र, छत्तीसगड व महाराष्ट्र अशा तीन राज्यांचे सीमास्थळ, अशा अनेक गोष्टी पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करता येऊ शकतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
स्वतंत्र पर्यटन एमआयडीसीच्या संकल्पनेचे विदर्भात स्वागत
उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मांडलेल्या राज्यात स्वतंत्र पर्यटन एमआयडीसीच्या संकल्पनेचे विदर्भात स्वागत झाले आहे. विदर्भातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, आनंदवन, महाकाली व मरकडा मंदिर, भद्रावतीच्या ऐतिहासिकगुंफा व जैन मंदिर, सोमनाथ व परिसरातील पर्यटन स्थळे तसेच अमरावती जिल्ह्य़ातील चिखलदरा, बघता या
First published on: 27-12-2012 at 01:45 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Plan of freedom tourisum midc welcome from vidharbha