शिरपूर शेतकरी साखर कारखान्याची जमीन कर्जफेड करण्याच्या नावाखाली विकण्याचा घाट घातला जात असून संचालक मंडळ सभासदांच्या हिताला बाधा निर्माण करीत असल्याचा आरोप करीत कारखान्याचे संचालक तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बबन चौधरी यांनी राजीनामा दिला आहे.
चौधरी यांनी साखर आयुक्तांकडे राजीनामा पाठवून दिला आहे. कारखान्याच्या उपाध्यक्षपदाचा यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला होता. दोन वर्षांपासून कारखाना बंद असून सभासद आणि कामगारांचे नुकसान होत आहे. मात्र प्रयत्न करूनही कारखाना सुरू होण्याची लक्षणे दिसत नसल्याने आणि कारखाना सुरू करण्यासाठी सहकार्य मिळत नसल्याने भविष्यात हा कारखाना सुरू होण्याची शक्यता वाटत नाही, असे चौधरी यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. राजकीय षड्यंत्रामुळे तसेच जिल्हा बँकेच्या कर्जविषयक आडमुठे धोरणामुळे आणि संचालक मंडळात असलेल्या समन्वयाच्या अभावामुळे कारखाना बंद पडला आहे. महत्त्वाचे म्हणजे कारखान्याने कर्जफेड करण्यासाठी जमीन विक्रीची तयारी सुरू केली आहे.
सदरची जमीन विकणे हे कारखान्याच्या व सभासदांच्या हिताचे ठरणार नाही. त्यामुळे या जमीन विक्रीस आपला विरोध आहे. बहुमताच्या जोरावर जमीन विक्रीचा ठराव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणात आपला सहभाग राहू नये म्हणून संभाव्य घटनेच्या आधीच आपण पदाचा राजीनामा देत आहोत, असे चौधरी यांनी नमूद केले आहे. चौधरी यांनी केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा