दुष्काळग्रस्त तालुक्यांची आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा अधिक
दुष्काळग्रस्त तालुक्यांची आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा अधिक काढण्यात आल्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. नापिकी व पुराचा तडाखा बसलेल्या तालुक्यांची आणेवारी ५१ व ५२ टक्के दाखवून शेतक ऱ्यांना वंचित ठेवण्याचा राजकीय डाव असून सुनियोजितपणे ५० टक्क्यांपेक्षा अधिक आणेवारी दाखवा, अशा तोंडी सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या, असा गंभीर आरोप विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केला आहे. यवतमाळ जिल्ह्य़ात सरसकट दुष्काळ जाहीर करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे साकडे घातले.
यवतमाळ जिल्ह्य़ात होत असलेल्या शेतक ऱ्यांच्या आत्महत्या, अतिवृष्टी व नापिकीच्या पाश्र्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने १६ पैकी १४ तालुक्यांची आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी दाखवत असतानाच सर्वात जास्त नापिकी व पुराचा तडाखा बसलेल्या केळापूर व झरी तालुक्यांची आणेवारी ५१ व ५२ टक्के दाखवून शेतक ऱ्यांना वंचित ठेवले आहे. यामध्ये आदिवासी व दलित शेतक ऱ्यांचा भरणा अधिक आहे. जिल्ह्य़ातील इतर १४ तालुक्यांप्रमाणे या दोन तालुक्यांची आणेवारी ५० टक्क्यांच्या आत दाखवावी, अशी मागणी तिवारी यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनातून केली आहे.
केळापूर व झरी तालुक्यात नापिकीचा सामना करीत असलेल्या लक्ष्ण टेकाम (महांडोळी), भुमन्ना अंधेवार (पेंढरी), गजानन कटकावार (वांजरी), सुपाऱ्या मेश्राम (पिंपळशेंडा), नागोराव सोयाम (पाथरी), सदाशिव किनाके (पिंपळापूर), विजय ठाकरे (धारणा), मनोज मडावी (खैरी), अशोक कोरडे (दाभा), लक्ष्मण कुसराम (पिंपड्र), प्रमोद पोतराजवार (धानोरा) या शेतक ऱ्यांनी आत्महत्या केल्या .
पुराच्या तडाख्याने पिंपळखुटी, कोदोरी,चनाखा, रुढा,अर्ली, हिवरी, खैरी, वडवाट, घुबडी, पिंपरी, तेलंगटाकळी, सायखेडा, वागदा, रुंझा, पाथरी, पिंपळशेंडा, वांजरी, बेलोरी, बोरगाव, चालबर्डी, साखरा, अकोली, बग्गी, ताडउमरी, ढोकी, मराठवाकडी, वाऱ्हाकवठा, सोनबर्डी, बोथ, भाऊउमरी, दाभा, सतपेल्ली, दुर्भा, पाटण, धानोरा, लिंगटी, दिग्रस, अडेगाव, खातेरा, येडद, येडशी, सुर्दापूर, हिवराबारसा, वठोली, हिरापूर, मांगली, कमळवेल्ली, अहेरअल्ली, टाकळी, दिमाडदेवी, येदलापूर, उमरी या गावांतील पिके उद्ध्वस्त झाली. उरलेल्या गावांतील पिके परतीच्या पावसाने उद्ध्वस्त झाली. याच दोन तालुक्यांची आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा अधिक दाखविण्यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी करा, खोटी आणेवारी सादर करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान केळापूर व झरी तालुक्यातील शेतकरी व शेतकरी विधवा उपोषण सत्याग्रह करतील. निष्क्रिय लोकप्रतिनधींमुळे केळापूर व झरीचे शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.
आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा अधिक दाखविण्यासाठी कोणते निकष लावतात हा शोध घेण्याचा विषय असून सगळा प्रकार राजकीय षड्यंत्र रचून प्रशासनाने केला आहे. आमदार व खासदारांनी अन्यायाविरोधात आवाज उठविला नाही तर त्यांना येत्या निवडणुकीत किंमत मोजावी लागेल, असा इशारा तिवारी यांनी दिला आहे.

Story img Loader