वांद्रे येथील ‘फादर कॉन्सिकिओ रॉड्रिग्ज’ महाविद्यालयाच्या वायुशास्त्र पथकाने तयार केलेले रिमोट कंट्रोलवरील विमानाने जागतिक पातळीवरील सातवा क्रमांक पटकावला आहे. अमेरिकेत डल्लास येथे दरवर्षी शंभर फुटावरून रिमोट कंट्रोलने विमान उडविण्याची आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेत या विद्यार्थ्यांनी शंभर फुटावरून विमान उडवून दाखविल्यानंतर त्यांना सातवे मानांकन देण्यात आले. याच महाविद्यालयाने गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेत दहावा क्रमांक पटकावला होता. यंदा रमेश कामत याच्या नेतृत्वाखालील पथकाने सातवा क्रमांक मिळविला आहे.
गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेत वजनाला हलके असलेले लाकूड वापरून विमान तयार करण्यात आले होते. यंदा कमी वजनाच्या लाकडासोबतच शक्य तितक्या ‘कार्बन फायबर’चा वापर करून विमान तयार करण्यात आले. कमी वजनाबरोबरच हवेचा प्रवाह लक्षात घेऊन सलग सात महिन्यांच्या परिश्रमातून साकारले गेलेले रिमोट कंट्रोलवरील विमान चाचणीत यशस्वी ठरल्यानंतर वायुशास्र पथक अमेरिकेला रवाना झाले.
या स्पर्धेत सहभागासाठी ई-मेलवर सादर केलेला अहवाल आणि प्रत्यक्ष सादरीकरण यावर आधारित गुण दिले जातात. या स्पर्धेत जगभरातील सुमारे ७५ निवडक महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता.

Story img Loader