पाणी टंचाईच्या काळात जनावरांना मुबलक चारा कसा उपलब्ध होईल? याविषयी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने शेतकऱ्यांना काही सूचना केल्या आहेत. जुलै मध्यावर येऊन ठेपला असतानाही पाहिजे तसा पाऊस न पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शिवाय त्यांची दुबार पेरणीही वाया गेली. अशा परिस्थितीत शेतकरी व पशुपालकांकडील जनावरांसाठी चारा टंचाईचा प्रश्न निर्माण होणे शक्य आहे.
जनावरांसाठी पुढील काळात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास चारा उपलब्ध व्हावा म्हणून पावसाळ्यात योग्य नियोजन करण्याचे आवाहन विद्यापीठाचे विस्तार व प्रशिक्षण संचालक डॉ. एन.एन. झाडे यांनी केले आहे. कमी ते मध्यम पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी चारा पिकांची लागवड करण्यासाठी पेरणीचा काळ तसेच बाजारात उपलब्धतेनुसार चारा प्रकाराची निवड करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. मका हे पीक जून ते ऑक्टोबर तसेच फेब्रुवारी आणि मार्चमध्ये येते. त्याची लागवड करावी. ज्वारी, बाजरी आणि हायब्रिड नेपिअरचा उपयोगही जनावरांचा चारा म्हणून करण्यात येतो. ज्वारी या पिकाचा पेरणीचा काळ मार्च ते जुलै महिना आहे. तर बाजरी जुलै ते ऑगस्टमध्ये पिकवता येते. हायब्रिड नेपिअरसाठी पाणी उपलब्ध असल्यास पेरणी केव्हाही करता येते.
चारा टंचाईच्या काळात शेतकरी सुबाभूळ, दशरथ, शेवरी झाडांची रोपे पॉलिथिन बॅग्ज किंवा गादी वाफ्यावर तयार करून रोपवाटिका तयार करू शकतात. ५० दिवासांमध्ये त्यांचे रोपण शक्य होते. चारा टंचाईत वड, पिंपळ, उंबर, शिसम, बांबू, मलबेरी, सुबाभूळ, धमन या झाडांची पाने चारा म्हणून उपयोगात येऊ शकतो. निकृष्ठ चाऱ्यावर युरिया व उसाची मळी वापरून चाऱ्याची प्रत वाढवणे शक्य आहे. यासाठी युरिया दोन किलो, १० लीटर पाण्यात विरघळून १० किलो उसाची मळी त्यात कालवून घ्यावी. हे मिश्रण वाळलेल्या गव्हांडा व चारा पिकांपासून प्राप्त टाकावू पदार्थावर शिंपडावे. अशाप्रकारे प्रक्रिया केलेला चारा रोजचा चार-पाच किलो प्रत्येक जनावराला द्यावा. वाळलेला चारा, पीक काढल्यावर उरणारे पिकांचे धांडे किंवा अवशेष शेतात न जाळता त्याचे वर सांगितल्याप्रमाणे मूल्यवर्धन शक्य असल्याचे डॉ. झाडे यांनी कळवले आहे.

Story img Loader