ग्रामपंचायत सरपंचपदाच्या महिला आरक्षणाच्या सोडतीला बहुसंख्य इच्छुक उमेदवारांचे पतीच मोठय़ा संख्येने उपस्थित होते. एकूण ७०५ पैकी जवळपास साडेतीनशे ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचा कारभार महिलांच्या हाती निश्चित झाला आहे.
आरक्षण महिलांसाठी असले तरी निवडणुकीपासूनच इच्छुक उमेदवार महिलांच्या नावाने निवडणुकीत मिरवत आहेत. अनेक ठिकाणी सरपंचपदाची बोली करून बिनविरोधच्या नावाखाली खुर्चीचा सौदा झाल्याची चर्चा आहे! त्यामुळे काही ग्रामपंचायत सदस्य संख्येइतकेच उमेदवारी अर्ज दाखल होत आहेत. तालुका तहसील कार्यालयावर इच्छुकांनी उमेदवारीसाठी तोबा गर्दी केल्याने ग्रामीण भागातील वातावरण तापले आहे.
जिल्ह्य़ात दुसऱ्या टप्प्यात ७०५ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या (शनिवारी) शेवटची तारीख आहे. त्यामुळे शुक्रवारी सर्व तहसील कार्यालयांवर मोठय़ा संख्येने अर्ज भरण्यास गर्दी झाली होती. जवळपास दहा हजार अर्जाची विक्री झाली. इच्छुकांच्या तोबा गर्दीमुळे सर्वच राजकीय पक्षांच्या स्थानिक पुढाऱ्यांसमोर तडजोडीचे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पक्षीय धोरणापेक्षा गावातील गटावर या निवडणुका लढवल्या जातात. काही गावांत मंदिराचे बांधकाम, गावच्या विकासासाठी निधीची रक्कम बोलून सरपंचपद पाच वर्षांसाठी पदरात पाडून घेण्याचे निश्चित झाले आहे. गावात ठरले तरी निवडणूक अधिकाऱ्याकडे सदस्य संख्येइतकेच उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक बिनविरोध केली, असे दाखवले जाते. प्रत्यक्षात बिनविरोध निवडीच्या पडद्याआड खुर्ची काबीज करण्याचे आडाखे बांधले जातात.
गुरुवारी आरक्षण सोडतीला सर्व तहसील कार्यालयांत महिला प्रतिनिधीऐवजी इच्छुकांचे पतीच मोठय़ा संख्येने उपस्थित होते. निम्म्या ग्रामपंचायतीचे सरपंचपद ५० टक्के आरक्षणामुळे आरक्षित झाल्यामुळे अनेकांच्या इच्छेवर पाणी फिरले आहे. महिला आरक्षण गृहीत धरून पत्नीच्या नावाने सरपंचपद मिळवण्याचे अनेकांनी ठरवले आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्यापासूनच उमेदवार पत्नीच्या नावाने पतीच मिरवत असल्याचे चित्र दिसत आहे. या वेळी ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून आष्टी मतदारसंघात राष्ट्रवादीअंतर्गत दोन नेते परस्परांच्या विरोधात ग्रामीण भागात उघडपणे बांधणी करीत आहेत. गेवराई तालुक्यातही दोन्ही आमदार पंडित राष्ट्रवादीच्या झेंडय़ाखाली एकत्र आल्यामुळे स्वत:चा गट सांभाळत पक्षाचा झेंडा कायम ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. परळी तालुक्यात मुंडे कुटुंबातील गृहकलहानंतर गावागावांत दोन गट आमने-सामने लढण्यासाठी सज्ज झाले आहेत.   

Story img Loader