जलसंपदा विभाग व प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळेच जायकवाडी धरणातील पाण्याचा अचल साठा वापरात आणला गेला नाही. त्यामुळेच नगर व नाशिक जिल्हयातील जनतेवर शेती व पिण्याच्या पाण्याचे संकट ओढावले आहे असे मत कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केले.
संगमनेर तालुक्यातील आस्वी येथे झालेल्या कार्यक्रमात मंत्री विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी जि. प. सदस्य आण्णासाहेब भोसले होते. जि. प.च्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे, गटविकास अधिकारी भुपेंद्र बेडसे आदी यावेळी उपस्थित होते.
विखे म्हणाले, खाली पाणी जाण्यासाठी काही लोक भगीरथ होण्यास निघाले आहेत. त्यांना लोकांच्या प्रश्नांपेक्षा स्वत:ची राजकीय महत्वाकांक्षा महत्वाची होती. पाण्याच्या नियोजनामध्ये प्रशासनाचा नाकारर्तेपणा खऱ्या अर्थाने कारणीभूत ठरला. बदलत्या हवामानामुळे शेती व्यवसाय संकटात येत असून यापुढे शेतकऱ्यांनी समूहशेतीचा प्रयोग राबवावा. त्यासाठी सरकार मोठया प्रमाणात मदत करण्यास तयार आहे. दुष्काळाचा फटका राज्यातील फळबागांना बसल्याने सरकारने मानवतेच्या भुमिकेतून शेतकऱ्यांना आíथक पॅकेज दिले आहे. राज्यात तीन लाख हेक्टर फळबागांना मदत करण्यात येणार आहे.
शालिनीताई विखे म्हणाल्या, जिल्हा परिषद ही सर्वसामान्य जनतेची नाडी आहे, जि. प.च्या माध्यमातून आपण सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम केले. प्रत्येकाने नोकरीच्या मागे न लागता स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करावेत. बचतगटाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण होत आहे. त्यामुळे महिला आता त्यांच्या पायावर विविध व्यवसायाच्या माध्यमातून उभ्या रहात आहेत.
उपविभागीय कृषि अधिकारी सुधाकर बोराळे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची, तर गटविकास अधिकारी भुपेंद्र बेडसे यांनी पं. स.च्या विविध योजनांची माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Planning of jayakwadi failed radhakrishna vikhe