योग्य संधी व विश्वासाचा हात मिळाला की दुर्भाग्य गाठीशी बांधून जन्मलेल्यांच्याही जीवनात परिवर्तन घडून येऊ शकते. प्लॅटफॉर्म शाळेने दिलेल्या आधारामुळे रेल्वे स्थानकावरचे जिणे नशिबी आलेल्या व गुन्हेगारीकडे वळू पाहणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या आयुष्यात किंचितसे का होईना, पण प्रकाशाचे कवडसे आता डोकावू लागले आहे.
देशभरातील रेल्वे स्थानकांवर भीक मागणारी, कचरा साफ करणारी कळकट दिसणारी मुले ही सर्वासाठी नित्याची बाब आहे. आपण सर्वानी कधी ना कधी त्यांच्याकडे तिरस्काराने किंवा दयेने करीत नाही. याच मुलांना आधार देऊन गुन्हेगारीच्या, व्यसनांच्या, अत्याचाराच्या आणि लाचारीच्या चक्रातून बाहेर काढण्याचे आव्हान ‘प्लॅटफॉर्म’ शाळेने स्वीकारले व त्याचे चांगले परिणाम आता दिसू लागले आहेत.
लोहमार्ग पोलीस, नागपूर महापालिका व विश्व हिंदू जनकल्याण परिषद यांच्या वतीने गीतांजली टॉकिजजवळील बजेरिया परिसरात महापालिकेच्या इमारतीत चालविल्या जाणाऱ्या या शाळेने उपेक्षित मुलांना अर्थपूर्ण आयुष्य जगण्याची स्वप्ने व ती पूर्ण करण्याची उमेदही दाखविली आहे. हळूहळू हा होईना पण, या मुलांच्या जीवनात चांगले बदल घडून येत आहेत. या शाळेच्या अगदी सुरुवातीच्या दिवसात येथे आणला गेलेला लाल हा मुलगा अगदी अल्पवयात विविध गुन्हे करण्याला सरावला होता. प्लॅटफॉर्म शाळेत आणल्यानंतर तेथील मुले आणि कर्मचारीदेखील त्याला कंटाळून गेले होते. एक दिवस या शाळेची जबाबदारी सांभाळणारे श्रीकांत आगलावे त्याला एका अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर घेऊन गेले आणि तिथे उभे राहून बोलता बोलता लालच्या नकळत त्याच्या मनात अभियंता बनण्याचे बीज रोवले गेले. आज लाल ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मन लावूल अभ्यास करू लागला आहे.
इतकेच नव्हे, संस्कृत श्लोक घडाघडा म्हणावयास लागला आहे. मूळचा बिहारमधील असलेल्या ५-६ वर्षांच्या दीपकला पोलिसांनी या शाळेत आणले तेव्हा तो मादक द्रव्यांचे सेवन करू लागला होता. बालसुधार गृहाचा अनुभव घेऊन आल्यावर तो आता येथे राहतो आहे व महापालिकेच्या शाळेत ५ व्या वर्गात शिकत आहे.
भंडाऱ्याचा पीयूष मोटघरेने एका बीअर बारमध्ये काम करताना सर्व अत्याचार सहन केले. प्लॅटफॉर्म शाळेने त्याला अभियांत्रिकी पदविकेला प्रवेश घेऊन दिला. मात्र, तो अभ्यास न जमल्याने पीयूष तेथून निघून गेला. त्याला समजावून परत आणण्यात आले व ११ वी ला त्याला प्रवेश घेऊन दिला. सध्या तो १२ वी ला शिकत आहे. ही काही मोजकी उदाहरणेच अपेक्षांची आस निर्माण करणारी आहे. यांच्यासारखी अनेक मुले शाळेने दिलेल्या आधारावर प्रगतीचा मार्ग चोखाळू लागली आहे.
‘ गुन्हेगारीच्या दुष्चक्रात सापडलेल्या या मुलांना एका ठिकाणी थांबवून ठेवणे कठीण आहे. त्यांना रिकामा वेळ मिळू नये व ती गुंतून राहावीत म्हणून विविध उपक्रम त्यांनी दिले आहेत. प्रत्येक मुलाला आम्ही त्याचे ध्येय ठरविण्याचा सल्ला देतो. राहणे व खाण्याच्या सुविधांबरोबरच मुलांना आपुलकी देण्याचा प्रयत्न करीत आहोत. या आपुलकीमुळे या मुलांमध्ये चांगले काहीतरी करण्याचा विश्वास येऊ लागला आहे व सकारात्मक बदल दिसू लागला आहे,’ असे आगलावे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
दुर्भाग्यावर मात संधी व प्रयत्नांची!
योग्य संधी व विश्वासाचा हात मिळाला की दुर्भाग्य गाठीशी बांधून जन्मलेल्यांच्याही जीवनात परिवर्तन घडून येऊ शकते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 14-11-2014 at 07:30 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Platform school for childrens