कोल्हापुरात १ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या केपीएल टी-२० स्पर्धेचे वातावरण तयार होऊ लागले आहे. संघातील खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडल्यानंतर गुरुवारी स्पर्धेच्या प्रसारासाठी शहरात खेळाडू व पदाधिकाऱ्यांनी रॅली काढली. या रॅलीला शहरातून चांगला प्रतिसाद मिळाला.
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने केपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रिण्यू ग्रीन एनर्जी (कर्णधार वैभव पाटील), घाटगे वॉरिअर्स (कर्णधार शैलेश भोसले),पूजा वंडर्स (कर्णधार अभिजित रेडेकर), डी.वाय.पाटील स्पोर्ट्स (कर्णधार युवराज यवलूजकर), जे.के.फायटर्स (कर्णधार संतोष उपाध्ये), एस.चार.टारगर (कर्णधार वैभव चौगुले) आणि शाहूपुरी जिमखाना (कर्णधार अभिजित काटे) या प्रमुख संघांचा सहभाग आहे. या कर्णधारांच्या समवेत हॉटेल अॅट्रिया येथे खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडली.
या स्पर्धेचा प्रसार व प्रचार होण्यासाठी गुरुवारी रॅलीचे आयोजन करण्यात आले. स्पर्धा होणाऱ्या शास्त्रीनगर मैदानात रॅलीचा प्रारंभ महापालिकेचे उपायुक्त संजय हेरवाडे यांच्या हस्ते झाला. यावेळी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटणकर, उपाध्यक्ष व्ही.एन.भोसले, निवड प्रक्रियेचे सदस्य नंदू बामणे, ऋतुराज इंगळे, विजय भोसले, राहुल देसाई आदींचा समावेश होता. त्यानंतर ही रॅली शहराच्या मुख्य मार्गावर निघाली. त्यामध्ये प्रत्येक संघाचा ध्वज घेतलेले कर्णधार व खेळाडू संघाच्या गणवेशामध्ये सहभागी झाले होते. शहरात या स्पर्धेचे वातावरण निर्माण करण्यात रॅली यशस्वी झाल्याचा दावा संयोजकांनी केला.
टी-२० स्पर्धेच्या खेळाडूंची रॅली
कोल्हापुरात १ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या केपीएल टी-२० स्पर्धेचे वातावरण तयार होऊ लागले आहे. संघातील खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडल्यानंतर गुरुवारी स्पर्धेच्या प्रसारासाठी शहरात खेळाडू व पदाधिकाऱ्यांनी रॅली काढली. या रॅलीला शहरातून चांगला प्रतिसाद मिळाला.
First published on: 30-11-2012 at 09:24 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Players rally of t 20 competition