आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय धावपट्टूंची नगरी म्हणून उदयास येणाऱ्या उरणला खेळाचे मैदान व क्रीडा संकुल उभारणीसाठी शासनाकडून एक कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. मात्र क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी उरण परिसरात शासकीय जमीन उपलब्ध नाही. त्यामुळे क्रीडा विभागाने सिडकोकडे भूखंडाची मागणी केली आहे. मात्र सिडकोच्या नियमानुसार क्रीडांगणासाठी लागणाऱ्या अडीच एकर जागे करिता किमान ६४ लाख रुपये मोजावे लागणार असल्याने एक कोटीच्या निधीतून ६० टक्के रक्कम जमिनीवरच खर्च झाल्यास उरणमधील क्रीडांगण व खेळाचे मैदान रखडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शहराचे शिल्पकार म्हणून बिरुद मिरविणाऱ्या सिडकोने उरण परिसरातील एकाही गावात मैदानाची सोय केलेली नाही. असे असले तरी उरण तालुक्यातील अनेक धावपट्टूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरून मॅरेथॉन स्पर्धेत घवघवीत यश संपादित केलेले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू उरणमध्ये खडतर परिस्थितीत खडी मातीच्या रस्त्यावरून धोकादायक सराव करीत आहेत. या संदर्भात सिडकोकडे वारंवार मागणी केल्यानंतर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी खेळाच्या मैदानासाठी पाच एकरच्या भूखंडाचे आरक्षण करणार असल्याचेही आश्वासन दिलेले आहे. मात्र तालुका क्रीडांगणासाठी लागणाऱ्या अडीच एकर जमिनीला लागणारी रक्कम शासनाच्या अनुदानातून दिल्यास क्रीडांगणाचे काम अपूर्णच राहण्याची शक्यता असल्याने उरण तालुक्यासाठीचे खेळाचे मैदान रखडण्याचीच शक्यता निर्माण झाली आहे. मात्र यामधून मार्ग काढीत रायगडच्या क्रीडा विभागाच्या अधिकारी सुनीता रिकामे यांनी उरण नगरपालिकेच्या वीर सावरकर मैदानात अॅथेलेटिकसाठी रनिंगची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच सिडकोच्या जमिनीचाही प्रश्न सुटेल, असाही विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला आहे.
भूखंडाच्या वाढत्या किमतीमुळे खेळाचे मैदान रखडण्याची शक्यता
आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय धावपट्टूंची नगरी म्हणून उदयास येणाऱ्या उरणला खेळाचे मैदान व क्रीडा संकुल उभारणीसाठी शासनाकडून एक कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.
First published on: 01-05-2014 at 12:19 IST
TOPICSप्लॉट
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Playground work struck down due to plot rate increasing in uran