मन, बुध्दी आणि चित्त यांची योग्य सांगड घातली तर आनंदमयी जीवनाचा मार्ग अत्यंत सोपा आहे. मात्र, त्यासाठी शरीराची साथ मिळणे गरजेचे असून ही गोष्ट व्यायाम आणि आहारातूनच साध्य होऊ शकते, असे प्रतिपादन पुणे येथील प्रसिध्द फिजीओथेरपिस्ट डॉ. राजीव शारंगपाणी यांनी येथे बोलताना केले.
स्व. केशवदास नगरकर व स्व. रंजनाबाई नगरकर यांच्या स्मरणार्थ नगरकर क्लासेसच्या वतीने आयोजित मालिकेत ‘आनंदमयी जीवन’ या विषयावर डॉ. शारंगपाणी यांचे व्याख्यान झाले. यावेळी ते बोलत होते. आयएमएसचे संचालक डॉ. शरद कोलते, क्लासचे संचालक प्रा. विलास नगरकर, विनोद नगरकर आदी यावेळी व्यसपीठावर उपस्थित होते.
डॉ. शारंगपाणी म्हणाले, आनंदमयी जीवनाची सुरूवात विद्यार्थिदशेतच केली पाहिजे. वेळेवर खाणे, व्यायाम करणे, झोपणे या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्याचे भान आधी पालकांना असले पाहिजे. केवळ अभ्यासच नाही तर, मुलांच्या शारिरीक जडणघडणीकडेही तेवढेच लक्ष दिले पाहिजे. शिक्षणाएवढेच महत्व व्यायामाला आहे हे लक्षात घ्या. शरीर स्वस्थ असेल तर मनाप्रमाणे कार्य होऊ शकते. त्यासाठी आहार तेवढाच महत्वाचा आहे. प्रामुख्याने जाहिरात केले जाणारे अन्नपदार्थ व शीतपेये टाळणे आवश्यक आहे. शैक्षणिक गोष्टींचा अतिरेक किंवा बाऊ करण्यापेक्षा व्यायाम कटाक्षाने करा, त्यातच आनंदमयी जीवनाचा मार्ग दडला आहे, असे प्रतिपादन डॉ. शारंगपाणी यांनी केले.
विनोद नगरकर यांनी सुरूवातीला प्रास्ताविक केले. बाळासाहेब गांधी यांच्या हस्ते डॉ. शारंगपाणी यांचा सत्कार करण्यात आला. सरिता गुजर यांनी डॉ. शारंगपाणी यांचा परिचय करून दिला.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा