‘यूआयडीएसएसएमडी’अंतर्गत परभणी शहर पाणीपुरवठा योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. येत्या चार-पाच महिन्यांत उर्वरित काम पूर्ण होईल. जलशुद्धीकरण केंद्र, नवीन जलकुंभाचे बांधकाम व जलवाहिनी टाकण्याचे कामही हाती घेण्यात येणार आहे. यामुळे भविष्यात शहराचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार आहे, असा विश्वास महापौर प्रताप देशमुख यांनी व्यक्त केला.
महापौर देशमुख, आयुक्त सुधीर शंभरकर यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, माध्यमांचे प्रतिनिधी यांनी योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या कामाची पाहणी केली. जिंतुरात शहरी भागातून पाइप टाकण्याचे काम चालू आहे. बोरी गावातून जाणारे पाइप लवकरच टाकण्यात येतील, अशी माहिती देण्यात आली. माणकेश्वर येथे साठवण तलाव बांधला आहे. याची १२५ कोटी लीटर साठवणक्षमता आहे. यलदरी येथे उद्भव विहिरीचे काम पूर्ण झाले आहे. मोटारपंप आदी साहित्य पोहोचले आहे.
यलदरीपासून सात किमी अंतरावर साठवण टँकर बांधला आहे. तेथून परभणीजवळील नियोजित जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाइप टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्याचे जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. साठवण तलावापासून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत गुरुत्वाकर्षणाद्वारे पाणी पोहोचविले जाणार आहे. त्यामुळे विजेच्या खर्चात मोठी बचत होईल, असे महापौर देशमुख यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. जलशुद्धीकरण केंद्रासाठी जागेचा शोध सुरू असून, शहरात ४ जलकुंभ उभारले जाणार आहेत. पकी जलकुंभाचे काम सुरू झाल्याची माहिती देशमुख यांनी दिली.
नगरसेवक दिलीप ठाकूर, अतुल सरोदे, सचिन देशमुख, बाळासाहेब बुलबुले, गुलमीर खान, अॅड. जावेद कादर, प्रमोद वाकोडकर, कंत्राटदार जी. जी. अग्रवाल, नगर अभियंता बाळासाहेब दुधाटे, यलदरी धरणाचे अभियंता सुधाकर जोशी आदींची उपस्थिती होती.

Story img Loader