येत्या वर्षात पाऊस भरपूर होईल, मात्र खरिपाचे पीक जेमतेम हाती लागेल असे व्होईक गुरुवारी वर्तविण्यात आले. पावसाळ्याच्या पूर्वाधात चांगल्या पावसाचे भाकीत वर्तवून त्यामुळे दुष्काळ हटेल असा दिलासा या व्होईकात देण्यात आला.
शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी पारनेरच्या नागेश्वर मंदिर परिसरात आगामी वर्षाच्या प्रत्येक महिन्यातील पिक पाण्याच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. मंदिराचे पुजारी योगेश वाघ यांनी पंचाग वाचन केले तर पोलिस पाटील बाळासाहेब औटी यांनी पुजन केले.
समाधानकारक पावसामुळे धान्य तसेच फळांचे चांगले उत्पादन होईल, यज्ञ समारंभासारखे कार्यक्रम होतील. आगीपासून त्रास तर चोरांचा सुळसुळाट होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली. मंगल कार्याचे वातावरण राहून विद्वानांचा गौरव होईल. ऊस, कापूस, सोने, केशर, रेशीम, चंदन मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल.
रब्बीचा स्वामी सूर्य असल्याने पाण्यापासून रोगराई उद्भवण्याचा इशारा देण्यात येऊन जोंधळे, कुळीथ, हरबरे आदी कमी प्रमाणात पिकतील तर तीळ, उडीद, सातू, मुगाचे भरपूर प्रमाणात उत्पादन होईल. पोवळे, रक्तचंदन, तांब्याच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. धान्य महाग होईल, लोकांमध्ये बळ वाढून समाधानाचे वातावरण निर्माण होईल. सोसाटय़ाचा वारा सुटून वळीव, गारांचा पाऊस होईल पावसाळयाच्या पुर्वार्धात चांगला पाऊस होउन दुष्काळजन्य स्थिती दूर होईल. विविध नक्षत्रांमध्ये समाधानकारक पावसाचा होरा व्यक्त करण्यात आल्याने व्होईक ऐकण्यासाठी जमा झालेल्या शेतकरी वर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
सरपंच अण्णासाहेब औटी, उपसरपंच नंदकुमार देशमुख, शिवसेनेचे शहर प्रमुख विजय डोळे,बाळासाहेब पठारे, माजी सरपंच नामदेवराव मते, गणपतराव देशमुख, भास्कर बोरूडे, राधाकिसन पुजारी यांच्यासह शहरातील नागरीक यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
 

Story img Loader