नाशिकसाठी महिला व नवजात शिशू रुग्णालयाकरिता जागा निश्चित झाली असून यासंदर्भात पुढील कार्यवाही लवकरच करण्यात येईल, अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान यांनी दिली आहे. जयंत जाधव यांच्या प्रश्नावर त्या उत्तर देत होत्या.
नाशिक जिल्ह्यात कमी आरोग्य संस्था मंजूर केल्याबद्दल जाधव यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न मांडला.
मंजूर केलेल्या बृहत आराखडय़ासाठी २००१ ची लोकसंख्या, अस्तित्वातील आरोग्य संस्थांमधील अंतर, भौगोलिक स्थिती आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागण्या हेच निकष असतील तर त्यानुसार जिल्हा नियोजन समितीवर मान्यता घेऊन नाशिकमध्ये २५ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १८१ उपकेंद्रे, नऊ ग्रामीण रुग्णालय, दोन ग्रामीण रुग्णालयांचे श्रेणीवर्धन व चार ट्रामा केअर युनिट मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविलेले होते.
मात्र नाशिककरिता आठ आरोग्य केंद्रे, १९ उपक्रेंद्रे आणि दोन ग्रामीण रुग्णालये मंजूर केली.
नाशिकच्या बाबतीत दूजाभाव का केला व निकषाप्रमाणे प्रलंबित आरोग्य संस्था मंजुरीसाठी कोणती कार्यवाही करणार, असे प्रश्न जाधव यांनी केले.
खान यांनी जर आरोग्य संस्थांच्या मंजुरीबाबत आक्षेप असतील तर त्यासाठी संचालक, आरोग्य सेवा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आहे.
नाशिकबाबतची तक्रार व आक्षेप तपासून त्याबाबत कार्यवाही केली जाईल. तसेच महिला व नवजात शिशू रुग्णालयासाठी जागा निश्चित झालेली असून यासंदर्भात पुढील कार्यवाही लवकरच करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.