देसाईगंज शहरातील भगतसिंग वॉर्डालगत नैनपूर मार्गावरील नझूलच्या १५ एकर खुल्या जागेवर काही दलालांनी ले-आऊट पाडले आहेत. या जागेवर ५०० चौरस फुटापेक्षा अधिक आकाराचे प्लॉट पाडून प्रत्येकी ३० हजाराहून अधिक रुपयांना प्लॉटची अनधिकृत विक्री केली जाते.
संबंधित दलालांनी स्वत:ची वडिलोपार्जित जमीन असल्यासारखे ले-आऊट टाकून नझूलच्या जागेची विक्री सुरू केल्याने या गोरखधंद्यात महसूल विभागाचा तर हात नाही ना, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. या १५ एकराच्या खुल्या जागेवर केलेले बेकायदेशीर अतिक्रमण अनधिकृत ठरवून एकूण २१ अतिक्रमणधारकांवर कायदेशीर कारवाई करून तात्काळ अतिक्रमण काढण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी ४ मे २०१२ ला काढले होते. या आदेशाच्या प्रतिलिपी तहसीलदार, पोलीस निरीक्षक, उपअधीक्षक तालुका भूमी अभिलेख, देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांना दिल्या होत्या, मात्र सहा महिन्यांचा कालावधी लोटूनही कोणतीच कारवाई झाली नाही.
दलालांनी या शासकीय जागेवरील प्लॉटची विक्री करून लाखो रुपयांची कमाई केल्याची चर्चा आहे.  शासकीय भूखंडाची परस्पर विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.