तासगाव साखर कारखाना बंद पाडण्याचाच पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा डाव असून, जनतेच्या न्यायालयातच या प्रकरणी दाद मागण्यात येईल, असे गणपती जिल्हा संघाचे अध्यक्ष संजय (काका) पाटील यांनी रविवारी पत्रकार बठकीत सांगितले.
तासगाव-पलूस सहकारी साखर कारखाना चालविण्यासंदर्भात राज्य सहकारी बँकेने निविदा मागविल्या होत्या. एक वर्षाच्या भाडे करारावर कारखाना चालविण्यास डॉ. पतंगराव कदम यांच्या सोनहिरा कारखान्याने १० कोटी १० लाखांची बोली लावली होती. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार गणपती संघाने कारखान्याचा ताबा राज्य बँकेकडे दिला. मात्र ही सर्व कारवाई रीतसर होऊन सोनहिराने शेवटच्या क्षणी कारखाना सुरू करण्यास असमर्थता दर्शवीत निविदेतील शर्ती आणि अटींमध्ये बदल करण्याची मागणी केली. वास्तविक कारखान्याचा ताबा देण्यापूर्वी कारखाना सुरू करण्याची तयारी दर्शवीत असताना सोनहिराने सर्व पाहणी करूनच निर्णय घेतला होता.
सोनहिरा कारखान्याने तासगाव कारखाना चालू करण्याची तयारी दर्शविताच गणपती संघाने सहकार्याची भूमिका घेतली होती. मात्र या मंडळींना तासगाव कारखाना सुरू करण्यापेक्षा तो बंद पडावा अशीच भूमिका घ्यायची होती. हे निविदा प्रक्रियेतून त्यांच्या त्रुटी काढण्याच्या हेतूमुळे स्पष्ट होते. तासगाव-पलूस सहकारी साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा राहावा अशीच आमची भूमिका असून त्यासाठी सभासदांमध्ये जाऊन जागृती करण्याचा प्रयत्न आमचा राहील असे पाटील यांनी सांगितले.
गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याशी तालुक्याच्या विकासाच्या भूमिकेवर आपण तडजोड केली. मात्र त्यांच्या राजकीय डावपेचामुळे कार्यकर्त्यांना अन्यायकारक प्रसंगांना तोंड द्यावे लागत आहे. यापुढील काळात त्यांच्याशी आमचा राजकीय संघर्ष सुरूच राहील असा इशारा देत पाटील म्हणाले, की सत्तेच्या दलालामुळे तालुक्याच्या विकासाला खीळ बसली आहे. कोणताही नवीन प्रकल्प सत्तेत असूनही आर. आर. पाटील यांना उभारता आला नाही. ठेकेदारीला प्रोत्साहन देत गौण खनिजाची चोरी करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचा उद्योग आर. आर. पाटील करीत आहेत.
कवठेमहांकाळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रकांत हाक्के यांनी गौण खनिजाचा केलेला साठा शासन अधिकाऱ्यांच्या सहकार्याने उघडकीस आणला. शासनानेच या गौण खनिजाबद्दल १५ कोटींचा दंड ठोठावला. अशा लोकांना पाठीशी घालण्याचा उद्योग आर. आर. पाटील करीत आहेत. या सर्व घडामोडींचा पर्दाफाश आपण जनतेच्या दरबारात जाऊन करणार असल्याचे संजय पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, तासगाव कारखाना सुरू करण्याबाबत सोनहिरा व गणपती जिल्हा संघाने असमर्थता दर्शविल्यानंतर काय भूमिका घ्यायची याबाबत सोमवारी राज्य सहकारी बँकेचा निर्णय उद्या (सोमवारी) घेतला जाणार आहे. सोनहिराबरोबरच गणपती जिल्हा संघाची निविदेसोबत भरलेली २५ लाखांची अनामत रक्कम राज्य बँकेने जप्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा