महापालिका सेवकांप्रमाणे पीएमपीच्या कामगारांनाही पाच ऐवजी सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय महापालिकेच्या स्थायी समितीने सोमवारी घेतला. पाच हजार सहाशे कामगारांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी ही माहिती दिली. पीएमपी कामगारांनी सहा हजार रुपये सानुग्रह अनुदानाची मागणी केली होती. मात्र, पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे, असा निर्णय स्थायी समितीने गेल्या आठवडय़ात घेतला होता. तरीही कामगारांच्या मागणीनुसार सहा हजार रुपये देण्याबाबत स्थायी समितीत सोमवारी पुन्हा चर्चा करण्यात आली आणि त्यानुसार सहा हजार रुपये देण्याचा निर्णय समितीने एकमताने घेतला.
पीएमपीच्या नियमित कर्मचाऱ्यांबरोबरच रोजंदारीवरील कामगारांना पाच हजार रुपये दिवाळी बक्षिशी द्यावी, अशीही मागणी करण्यात आली होती. ती मागणी देखील स्थायी समितीने मान्य केली असली, तरी त्याबाबत महापालिका प्रशासनाकडून अंतिम निर्णय झाला नव्हता. महापौर वैशाली बनकर, आयुक्त महेश पाठक तसेच अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यासाठी सोमवारी बैठका सुरू होत्या. या रकमेला मंजुरी मिळाल्यानंतर दोन हजार २०५ रोजंदारीवरील कामगारांना त्याचा लाभ होणार आहे. या कामगारांना बक्षिशी म्हणून जी रक्कम द्यावी लागणार आहे त्यातील ७५ लाख रुपये पुणे महापालिका, तर ५० लाख रुपये पिंपरी महापालिका देणार आहे.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा