वन विभाग आणि वन्यजीव संरक्षण संस्थेने केलेल्या संयुक्त कारवाईत दोन शिकाऱ्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याशी संबंधित शिकारी टोळीने गेल्या तीन महिन्यात पाच वाघांची शिकार केल्याची कबुली दिली आहे. अटक करण्यात आलेले बडलू (१७) आणि चिकू हे दोन्ही शिकारी वाघांच्या शिकारीचा व्यवसाय करणाऱ्या म्मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्य़ातील विशिष्ट समुदायातील असल्याने या टोळ्यांनी आता विदर्भातील जंगलांच्या दिशेने मोर्चा वळविल्याचे स्पष्ट झाले आहे.
पारंपरिक पद्धतीने वाघांची शिकार करणारी मध्य प्रदेशातील ही टोळी ‘कटनी गँग’ नावाने शिकारी जगतात ओळखली जाते. कटनीतील शिकारी टोळ्यांची जंगली भागात प्रचंड दहशत आहे. मेळघाट आणि ताडोबातील वाघांच्या शिकारीसाठी या टोळीने जाळे विणले असून अन्य सदस्यांचा आता शोध सुरू झाला आहे. हरयाणातील एका खरेदीदाराला विकण्यासाठी पाच वाघांची कातडी नागपूरच्या मनसर भागात विक्रीला आल्याची माहिती नागपूर ग्रामीणच्या पोलीस महानिरीक्षकांना गुप्तचरांच्या माध्यमातून मिळाल्यानंतर वन विभाग आणि वन्यजीव संरक्षण संस्था (डब्लूपीएसआय) यांनी संयुक्तपणे जाळे विणले. यात बडलू आणि चिकू अलगद अडकले. मात्र, खरेदी करणारा ग्राहक फरार होण्यात यशस्वी झाला. या खरेदी-विक्री प्रकरणातील वाहन वन खात्याच्या हाती लागले आहे. पूर्व मेळघाटच्या सीमेवरील परतवाडय़ानजीक बडलू आणि चिकू यांनी ज्या ठिकाणी वाघाची शिकार केली त्या जागेवर वाघाचे अवयव, रक्त आणि मांस आढळून आले आहे, अशी माहिती विभागीय वन अधिकारी (टेहळणी) पी.डीय्. मसराम यांनी दिली.
दोन्ही शिकाऱ्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी भंडारा जिल्ह्य़ातील तुमसरमध्ये एक तर मध्य प्रदेशातील कान्हा-पेंच संचारक्षेत्रात दुसऱ्या वाघाची शिकार केल्याची कबुली दिली आहे. दोन्ही वाघ नेमके विदर्भातील आहे वा मध्य प्रदेशातील याविषयी आपल्याला काहीच माहीत नाही, असे या शिकाऱ्यांनी चौकशीदरम्यान सांगितले आहे. परंतु, वन्यजीव संरक्षण संस्थेच्या माहितीनुसार दोन्ही वाघ विदर्भातील जंगलातीलच आहेत. दोन वाघांच्या कातडीची उमरेडमध्ये विक्री करण्यात आली, असे निरीक्षक आर.एम. पाटील यांनी सांगितले.
बडलू आणि चिकू यांचे वडिलही एकेकाळी वाघांची शिकार करण्यासाठी कुख्यात होते, अशी माहिती वन्यजीव संरक्षण संस्थेचे मध्य भारत शाखेचे संचालक नितीन देसाई यांनी दिली. मेळघाटात गेल्यावर्षीच्या डिसेंबरपासून कटनी गँगचा शिरकाव झाल्याची माहिती मिळाली होती. या गँगला पकडण्यासाठी जाळे विणण्यात आले होते. परंतु, कटनी गँगचे शिकारी यात अडकले नाहीत. मनसरलाही सापळा रचण्यात आला त्यानंतरही ही टोळी निसटून जाण्यात यशस्वी झाली होती. स्थानिक लोकांची या टोळ्यांना मदत असल्याच्या संशयावरून काहींना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर ६ जूनला अत्यंत गुप्त रितीने सापळा लावण्यात आला आणि दोन्ही शिकारी हाती सापडले. मेळघाटात गेल्या दोन वर्षांत वाघांची संख्या वाढल्याने शिकारी टोळ्यांचे लक्ष आता मेळघाटाकडे वळले आहे.
याचदरम्यान नागपूरपासून ४५ किमी अंतरावर हिंगणा वन परिक्षेत्रात एक वाघ मृतावस्थेत आढळून आला. त्यामुळे चालू वर्षांत विदर्भात एकूण नऊ वाघ मारले गेल्याचे स्पष्ट झाले आहे. यात नवेगाव राष्ट्रीय उद्यानातील एका नरभक्षक वाघाला गोळ्या घालण्यात आल्या होत्या. या वाघाने गोंदिया जिल्ह्य़ातील पाच महिलांवर हल्ला करून त्यांचे प्राण घेतल्याने त्याला गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले होते.

Story img Loader