नियोजित संजय हातमाग गृहनिर्माण संस्थेची नालेगाव भागातील तीन एकर जागा (सर्व्हे क्र. १५३/ १ ब व २ ब) सभासदांवर अन्याय करुन अन्य समाजाच्या ताब्यात देण्यात आली आहे, ही जागा मूळ सभासदांच्या नावे करावी या मागणीसाठी पद्मशाली समाजाने आंदोलनाचा पवित्रा जाहीर केला आहे. सभासदांनी यासंदर्भात जिल्हाधिका-यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले की, पद्मशाली समाजातील विडी कामगारांनी पैसे गोळा करुन ३० डिसेंबर १९८६ रोजी नालेगाव भागातील ही जागा खरेदी केली. मुख्य प्रवर्तक शिवराम मलय्या आडीगोपूल यांनी विडी कामगारांसाठी ही जागा खरेदी केली होती. त्या वेळी त्यांच्या समवेत शंकर नारायण वल्लाळ होते. वल्लाळ त्या वेळी संस्थेचे सभासदही नव्हते. परंतु अडिगोपूल यांच्या निधनानंतर मुख्य प्रवर्तक म्हणून जागेवर वल्लाळ यांचे नाव लागले. अडिगोपूल यांच्या निधनानंतर ही जागा ३० ते ३५ वर्षे तशीच पडून होती. सभासदांनी या जागेचे प्लॉट पाडण्याची मागणी केली व त्यासाठी अनंत दिकोंडा यांची नियुक्ती केली. तसे अधिकार पत्र वल्लाळ यांच्याकडून सर्व सभासदांसमोर लिहून घेण्यात आले. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नारायणराव वन्नम यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली होती व संस्थेचे दफ्तरही सुपूर्द करण्यात आले.
कालांतराने जमिनीच्या किंमती वाढल्याने वल्लाळ यांनी सदर जागेशी संस्थेचा कोणताही संबंध नसून जागा आपली, स्वत:च्या मालकीची आहे, अशी भुमिका घेतली. इतर समाजातील लोकांना जमा करुन बोगस सभा घेऊन सदर जागा दुस-याला सुपूर्द केली. जागा पद्मशाली समाजाची असून त्यांच्या पैशातून खरेदी केलेली आहे. त्यामुळे इतर कोणालाही जागा देणे पद्मशाली समाजावर अन्याय करणारे आहे. जिल्हाधिका-यांनी सदर जागा ताब्यात घेऊन, संस्थेवर नवीन पदाधिकारी नेमून मूळ सभासदांच्या नावे जागा करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Story img Loader