आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला स्वस्त भाजी केंद्रांवर रताळी आणि उपवासाच्या शेंगांची विक्री करून व्यापाऱ्यांनी मुंबईकरांना गुरुवारी सुखद धक्का दिला. किरकोळ बाजारात अवाच्या सव्वा दराने विकल्या जाणाऱ्या भाज्यांचे दर आटोक्यात यावेत यासाठी सरकारच्या स्वस्त भाजी विक्री केंद्रांमध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या २५ भाज्यांची विक्री सुरू करण्यात आली आहे. वाशीतील घाऊक बाजारातील दरांपेक्षा १५ टक्के अधिक दराने या विक्री केंद्रात भाज्यांची विक्री केली जाते. एकादशीच्या पाश्र्वभूमीवर बाजारात उपवासाच्या पदार्थाच्या किमती टोक गाठतात, असा अनुभव असतो. हे लक्षात घेऊन बुधवारपासून व्यापाऱ्यांनी या केंद्रांवर रताळी, शेंगा, फळांची विक्री सुरू केली. किरकोळ बाजारात उत्तम दर्जाची रताळी किलोमागे ४० ते ५० रुपयांना विकली जात असताना या केंद्रांमध्ये ती २४ रुपयांना मिळत होती.
किरकोळ बाजारातील महागाई मोडीत काढण्यासाठी राज्य सरकारने मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या परिसरात आतापर्यंत १९ स्वस्त भाजी विक्री केंद्रे सुरू केली आहेत. येत्या आठवडाभरात आणखी पाच सहकारी बाजारांमध्ये स्वस्त भाजी विक्री केंद्रे सुरू करण्यात येणार आहे. मुंबईकरांना पुणे तसेच नाशिक जिल्ह्य़ातून भाज्यांचा पुरवठा होत असतो. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाशीतील एपीएमसी बाजारात भाज्यांची आवक फारशी वाढलेली नाही. त्यामुळे घाऊक बाजारातील भाज्यांच्या किमती फारशा कमी झालेल्या नाहीत. सरकारच्या स्वस्त भाजी विक्री योजनेनंतरही किरकोळ बाजारात अजूनही भाज्यांच्या किमती फारशा कमी झालेल्या नाहीत. आषाढी एकादशीच्या पाश्र्वभूमीवर भाजी बाजारांमध्ये रताळी, शेंगा, बटाटे यांसारख्या भाज्यांच्या किमती मोठय़ा प्रमाणावर वाढतात. श्रावण महिन्यातही भाज्यांच्या किमतीमध्ये वाढ झालेली पाहावयास मिळते. गेल्या दोन दिवसांपासून किरकोळ बाजारात रताळी, शेंगा तसेच उपवासाच्या इतर भाज्यांच्या किमतीमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ झाल्याचे चित्र होते. त्यावर उपाय म्हणून किरकोळ भाजी विक्री केंद्रांवर रताळी तसेच शेंगांची विक्री सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती एपीएमसीचे संचालक शंकर िपगळे यांनी वृत्तान्तला दिली. एकादशीनंतर रताळय़ांची विक्री थांबविण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. चांगल्या दर्जाची रताळी किलोमागे २४ तर शेंगा ४४ रुपये किलोने विकण्यात येत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उपवासाच्या मुहूर्तावर रताळी, शेंगा स्वस्त
आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला स्वस्त भाजी केंद्रांवर रताळी आणि उपवासाच्या शेंगांची विक्री करून व्यापाऱ्यांनी मुंबईकरांना गुरुवारी सुखद धक्का दिला. किरकोळ बाजारात अवाच्या सव्वा दराने विकल्या जाणाऱ्या भाज्यांचे दर आटोक्यात यावेत यासाठी सरकारच्या स्वस्त भाजी विक्री केंद्रांमध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या
First published on: 19-07-2013 at 08:30 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pods and sweet potato get cheaper in fasting season