सगळ्याच पौर्णिमांना चंद्र जरी
असतो गोल
एखाद्याच चंद्राला कळते काळजातील माझ्या ओल..
कवयित्री अलका कुलकर्णी यांच्या काळजातून आलेल्या यांसारख्या अनेक कवितांना उपस्थितांनी भरभरून दाद दिली. त्यासाठी निमित्त ठरले ते येथील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित ‘कवितेवर बोलू काही..’ या कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात अलका कुलकर्णी यांची मुलाखत वाचनालयाच्या ग्रंथ सचिव कवयित्री मधुरा फाटक यांनी घेतली, तर कवी प्रशांत केंदळे यांची मुलाखत गायिका अनिता खर्डे यांनी घेतली.
ग्रंथसेविका प्रांजली चंद्रात्रे यांनी स्वागत केले. प्रास्ताविक जयश्री वाघ यांनी केले. वाइटातूनही काहीतरी चांगलेच घडणार या आशेवर अलका कुलकर्णी यांनी साहित्यभूषण पुरस्काराची परीक्षा दिली आणि त्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. त्यांची अशी माहिती मुलाखतीतून उपस्थितांसमोर येत असतानाच त्यांच्या कवितांनीही रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला.
काठावरले सारे काही गोदा घेऊन वाहिली
केला आघात पुरानं झाली जीवाची काहिली
यांसारख्या कवितांनी गोदावरीचे रौद्ररूप सर्वासमोर मांडले.
कवी प्रशांत केंदळे यांच्या कवितांमधून त्यांची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती उलगडत गेली. बोरी-बाभळीच्या सहवासात आपण वाढत गेल्याचे त्यांनी सांगितले.
दूर्वा भटकभवानी, येडी बाभुळ फिंदरी
सांगा रुईच्या पानात कुणी बांधली भिंगरी
यांसारख्या केंदळे यांच्या कवितांनी ग्रामीण भागातील परिस्थिती सर्वासमोर मांडली.
आता पावसा मातीशी कर लगीन साजरं
गुलमोहराचं कुंकू तिच्या भांगामध्ये भर
या त्यांच्या कवितेला रसिकांकडून चांगलीच दाद मिळाली. कवी विवेक उगलमुगले यांनी आभार मानले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा