स्वत:ला ओळखुन गुणांचा विकास करायला शिकले पाहिजे, न्युनगंडामुळे माणुस मानसिकदृष्टय़ा खचतो, त्यातुन उसळी मारुन वर येण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, जे चांगले वाटते ते प्रामाणिकपणे करा, असे प्रतिपादन कवी सौमित्र तथा चित्रपट अभिनेते किशोर कदम यांनी केले.
स्व. नवलमल फिरोदिया यांच्या स्मरणार्थ फिरोदिया ट्रस्ट (पुणे), अहमदनगर एज्युकेशन सोसायटी व स्नेहबंध (१९६७) यांच्या वतीने फिरोदिया शाळेतील मोने कलामंदिरात आयोजित करण्यात आलेल्या ‘वेध व्यवसाय प्रबोधन परिषदे’त ते बोलत होते. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
प्रत्येकात एकतरी चांगला गुण असतोच, तो स्वत:ला ओळखता आला पाहिजे, त्याचबरोबर जीनवात ध्येयही निश्चित करायला हवे, ध्येय निश्चित करता आले नाही तरी मनाला जे चांगले वाटते ते प्रामाणिकपणे करावे, ही वाटचालच ध्येयापर्यंत पोहचवते, प्रत्येक कामात आनंद असतो, तो मिळवता आला पाहिजे. पालकांनी मुलांना काय वाटते याचा विचार करावा, स्वत:ची स्वप्ने त्यांच्यावर लादू नका, असेही कदम यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कुसुमाग्रजांची ‘कणा’, अरुण कोल्हटकरांची ‘कविता’ व स्वरचित ‘कॉम्प्युटर आणि माझी माय’ या काव्यांचे सादरीकरण केले.
मुळच्या गुजरातच्या परंतु चळवळीच्या निमित्ताने सातारा, सांगलीतील माण परिसरात येऊन ग्रामीण महिलांची देशातील पहिली बँक स्थापन करणाऱ्या व बँकेच्या माध्यामातुन ‘मोबाईल बस बिझिनेस स्कुल’ सुरु करणाऱ्या गांधीवादी समाजसेविका डॉ. चेतना सिन्हा यांच्या अनुभवातुन ‘जिद्दीतुन जिवनाला दिशा मिळते व स्वप्नेच यशाचा मार्ग सुकर करतात’ असा संदेश उपस्थितांना मिळाला.
पिस्तुल्या, पायांना रस्ते नाहीत, फँड्री या माहितीपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आपले वडार समाजातील जीवन, वडिलांचे मजुरकाम यातुन कसे घडलो याविषयी सविस्तर माहिती दिली. अदिनाथ दहिफळे (शेवगाव) या ऊसतोडणी कामगाराच्या मुलाने आयआयटी (पवई) या प्रथितयश संस्थेतुन मिळवलेली एम. टेक. पदवी, लोहार समाजातील कुटुंबाचा गाडा हाकत उच्च शिक्षण घेणारा विजय पवार, गवंडी काम करतानाही चित्रकलेचा छंद जोपासणारा रोहिदास गाडे यांचेही अनुभव कथन झाले. यासर्वाचा जीवनपट मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी व लेखिका सुनंदा अमरापुरकर यांनी श्रोत्यांसमोर आणला.
अ. ए. सो.च्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांनी प्रास्ताविक केले. अभिनेते सदाशिव अमरापुरकर, गौरव फिरोदिया, आशाताई फिरोदिया, कल्याणी फिरोदिया तसेच संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Story img Loader