शहरासह जिल्ह्यातील नवोदित कविंना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असलेल्या येथील ‘नाशिक कवी’ या संस्थेचा काव्य मेळावा रविवारी गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकात सायंकाळी साडेचार वाजता आयोजित करण्यात आला आहे.
नाशिक कवी संस्थेचे अध्यक्ष प्रा. सुरेश मेणे हे मेळाव्याचे अध्यक्ष असतील. कवी लक्ष्मण महाडिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कवी मारुती सावंत यांच्या ‘तहानलेलं पाणी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन यावेळी होणार आहे. उपस्थित कविंचे काव्यवाचन झाल्यानंतर त्यांच्यातील तीन सवरेत्कृष्ट कविंना प्रत्येकी एक कविता संग्रह पारितोषिक देऊन कविंचा सन्मान केला जाणार आहे. नाशिक कवी ही संस्था काव्याच्या विविध प्रकारांची गोडी निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे.
विडंबन गीते, गझल, वृत्तातील कविता, मुक्तछंद, हायकू, चारोळ्या, कता, अभंग या काव्य प्रकारांची माहिती संस्थेच्या वतीने करून देण्यात येत आहे. संस्था नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून त्यांच्यातील काव्यगुणांचा विकास व्हावा या हेतूने कार्यरत आहे.
संस्थेचे सदस्य होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही. कविता करणाऱ्या प्रत्येकास सदस्यत्व बहाल केले जाते काव्य मेळाव्यासाठी कवी तसेच काव्यप्रेमी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संस्थेचे कार्याध्यक्ष शरद पुराणिक यांच्याशी ९८९०३८६६६२ या भ्रमणध्वनिवर संपर्क साधावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा