आयुष्य जगण्याचं
गुपित मला कळलं
सुख दिले वाटून सारे
दु:ख तेवढं ठेवलं..
अशा मनाला भिडणाऱ्या कविता सादर होत असताना उपस्थितांकडून त्यांना दाद मिळत होती. निमित्त होते येथील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित ‘कवितेवर बोलू काही’ या मैफलीचे. या मैफलीत कविवर्य सोमनाथ साखरे यांची प्रकट मुलाखत कवी रवींद्र मालुंजकर यांनी घेतली. सिंचन भवन परिसरात रंगलेल्या या कार्यक्रमात साखरे यांच्या ओठातून काव्य बाहेर पडत गेले. त्यांच्या वैविध्यपूर्ण कविता उपस्थितांना भावून गेल्या. मालुंजकर, सुनील देशपांडे, सुवर्णलता साखरे, विजयकुमार मिठे, अलका कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभी प्रतिमापूजन करण्यात आले. प्रास्तविक विवेक उगलमुगले यांनी केले. प्रत्यक्ष मुलाखतीच्या कार्यक्रमात सोमनाथ साखरे यांनी आपली कवितांच्या प्रांतातील मुशाफिरी अलवारपणे उलगडली.
कविवर्य तात्यासाहेब शिरवाडकरांची अनाहूत झालेली भेट आणि तात्यांनी पाठीवर ठेवलेला आशीर्वादाचा हात आजही आपणास लेखनासाठी ऊर्जा पुरवीत असल्याचे साखरे यांनी सांगितले. आपल्या कवितांचा चाहता असलेला भाऊ अकाली या जगातून जाणं हे चटका लावणारे ठरले. साहित्य प्रांतात काहीसं अलिप्त राहणं त्यामुळेच घडले असावे, असे मनोगत त्यांनी व्यक्त केल्यावर वातावरण भावपूर्ण झाले.
पिंपळाची पिकली पानं
पडू लागली होती
आणि घरटी सोडून पक्ष्यांची पिलं आता
उडू लागली होती..
निसर्ग, पक्षी यांच्यावरील प्रेम व्यक्त करणाऱ्या अशा एकाहून एक सुंदर कवितांच्या पेरणीमुळे कवी साखरेंची मुलाखत अधिकाधिक रंगत गेली. कवयित्री जयश्री वाघ यांनी सूत्रसंचालन केले.
सुख दिलं वाटून, दु:ख तेवढं ठेवलं..
अशा मनाला भिडणाऱ्या कविता सादर होत असताना उपस्थितांकडून त्यांना दाद मिळत होती. निमित्त होते येथील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित ‘कवितेवर बोलू काही’ या मैफलीचे.
First published on: 26-06-2014 at 12:12 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poetry program organised by public library of government employee