बिलाची रक्कम मिळण्यास विलंब होत असल्याने कंटाळून कंत्राटदाराने जिल्हा परिषदेच्या उपविभागीय कार्यालयात विष घेतले. सोमवारी दुपारी घडलेल्या या प्रकाराने एकच खळबळ उडाली.
तालुक्यातील खेर्डा येथे राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठय़ाचे काम समितीच्या माध्यमातून गुलाब जाधव नावाचा कंत्राटदार करतो. बिलाची रक्कम देण्यास विलंब होत असल्याने त्याने विष प्राशन केल्यानंतर अत्यवस्थ अवस्थेत त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता. जि. प. उपविभागीय कार्यालयात राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमातून सुमारे ३६ लाख रुपये खर्चातून गावातील पाणीपुरवठा समितीने हे काम पाझर तांडा येथील कंत्राटदार जाधव यांच्यामार्फत करून घेतले. जाधव सोमवारी दुपारी जि. प.च्या सिद्धार्थ कॉलनीतील उपविभागीय कार्यालयात आले होते. मात्र, काही वेळ थांबून पुन्हा आले तेव्हा त्यांनी विष प्राशन केले होते. तशा अवस्थेत ते उपअभियंता किशोर लिपणे यांच्या कक्षात गेले. तेथे त्यांना उलटय़ांचा त्रास सुरू झाला. या वेळी कार्यालयात कोणीच नव्हते. लिपणे हे जि. प. स्थायी समितीच्या बैठकीत होते. विष प्राशन केलेल्या जाधवची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला हिंगोलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपअभियंता लिपणे यांच्याशी या बाबत संपर्क साधला असता या व्यक्तीचा कार्यालयाशी काहीएक संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. गावातील समितीकडे पाणीपुरवठय़ाचे काम आहे. गेल्या वर्षांपासून हे काम चालू आहे. आतापर्यंत ५० टक्के काम झाले. कामाच्या देयकापोटी समितीला आतापर्यंत २० लाखांची रक्कम अदा केल्याचेही त्यांनी सांगितले. सोमवारी संध्याकोळपर्यंत पोलीस कारवाई झाली नव्हती.

Story img Loader