बैलपोळा सणाच्या पाश्र्वभूमीवर बलांना सजविण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याच्या दरात या वर्षी दुपटीने वाढ झाली. परिणामी बलपोळय़ावर महागाईचे सावट असल्याचे दिसून येत आहे.
पावसाळ्याचे तीन महिने सरले. परंतु अजूनही मोठा पाऊस न झाल्याने चिंताक्रांत बनलेल्या शेतकऱ्यांना महागाईतही हा सण साजरा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. गुरुवारी (५ सप्टेंबर) हा सण येत आहे. ग्रामीण भागात हा सण मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. या निमित्त शहरातील भुसारलाईन, गंजगोलाई, औसा रस्ता, बार्शी रस्ता, अंबाजोगाई रस्ता, गूळ मार्केट रस्त्यावरील दुकानात बलांचे सजावट साहित्य उपलब्ध केले आहे. महाराजा-महाराणी गोंडा, गजरा, घुंगरमाळा, कवडीमाळा, मणीमाळ, सूतदोरी, नायलॉन दोरी अशा साहित्यासह बलांची िशगे रंगवण्यासाठी आवश्यक विविध कंपन्यांचे वान्रेसही बाजारात आले आहे.
वर्षभर राबणाऱ्या बलांना पोळय़ाच्या आदल्या दिवशी स्वच्छ अंघोळ घातली जाते. दुसऱ्या दिवशीही सकाळी धुवून त्यांना सजवले जाते. गावातून ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढून घरात आणून पूजा केली जाते व पुरणपोळी खाऊ घातली जाते. या वर्षी बलपोळय़ासाठी लागणाऱ्या साहित्याच्या दरात दुपटीने वाढ झाली असली तरी शेतकऱ्यांचा खरेदीचा उत्साह मात्र कायम आहे.