पुण्याच्या कोणत्या भागात जास्त प्रमाणात अ‍ॅलर्जीचे आजार होतात आणि या आजारांमागे कोणते ‘छुपे कण’ आहेत हे लवकरच माहीत होणार आहे, कारण पुण्यात कोणत्या भागात असे कण (पोलन ग्रेन्स आणि फंगल स्पोअर्स) आढळतात याबाबत सर्वेक्षण करून त्याचे कॅलेंडर तयार केले जाणार आहे.
या संशोधन प्रकल्पाची दिशा ठरविण्याचे काम सध्या सुरू आहे, अशी माहिती ‘इंडियन एअरोबायोलॉजिकल सोसायटी’ चे अध्यक्ष डॉ. टी. एन. मोरे यांनी दिली आहे. शहराच्या विविध भागांत, विविध ऋतूंत हे संशोधन केले जाणार आहे. त्या-त्या भागांतील हवेचे नमुने मिळवून, त्यांच्या विश्लेषणाद्वारे त्यात कोणते पोलन आणि फंगल स्पोअर्स (परागकण व बुरशीचे कण) आहेत याचा शोध घेतला जाणार आहे. त्याद्वारे कोणत्या भागात कोणत्या अ‍ॅलर्जिक आजाराचा धोका असू शकतो, हे कळू शकेल. त्यानुसार त्या त्या भागातील नागरिकांना विशिष्ट अ‍ॅलर्जी न होण्याच्या दृष्टीने काळजी घेता येईल.
या पूर्वी १९९८-२००२ या कालावधीत कोथरूड भागात असा अभ्यास झाला होता. या भागात पूर्वी असलेल्या कचरा डेपोमुळे अ‍ॅलर्जीचे आजार आजारांचा धोका वाढतो का, हे या पाहणीत तपासले गेले होते. पाहणीअंती त्या त्या भागात अ‍ॅलर्जीकारक असलेले ३२ वेगवेगळ्या प्रकारचे पोलन व फंगल स्पोअर्स सापडले होते. कचरा डेपोच्या अगदी जवळ राहणाऱ्या लोकांमध्ये हवेद्वारे होणाऱ्या अ‍ॅलर्जीचे प्रमाण कमी आढळले. तर डेपोपासून सुमारे १५० मीटरचा परीघ सोडून बाहेरील लोकवस्तीत बुरशीच्या कणांमुळे होणाऱ्या अ‍ॅलर्जीचा प्रादुर्भाव दिसला. डेपो उंचावर असल्याने कचऱ्यावर वाढणाऱ्या बुरशीचे कण हवेत उडून ठराविक अंतराबाहेर त्यांचा त्रास जाणवत होता.
डॉ. मोरे म्हणाले, ‘‘हवेतील काही कणांचे प्रमाण वाढल्यावर ते अ‍ॅलर्जीकारक ठरतात. तर काही विशिष्ट प्रकारांत एखाद्या कणानेही अ‍ॅलर्जीचा धोका असू शकतो. वेगवेगळ्या कणांतील अ‍ॅलर्जीकारक प्रथिनांच्या प्रमाणात फरक असतो. प्रत्येक व्यक्तीला औषधाची मात्रा जशी वेगवेगळी लागू पडते, त्याचप्रमाणे एकाच प्रकारच्या कणांमुळे अ‍ॅलर्जी होण्याचा धोकाही व्यक्तीनुसार कमी-जास्त असतो. घाणीचे साम्राज्य असणाऱ्या जागा, जुन्या वस्तूंची गोडाऊन्स, बाजारपेठेतील मोठय़ा प्रमाणावर माल भरून ठेवलेल्या जागा, रुग्णालये अशा ठिकाणी लोकांना शिंका येणे, त्वचेवर पुरळ उठणे, खाज येणे असे अ‍ॅलर्जिक आजार दिसून येतात. सार्वजनिक ठिकाणी आणि इमारतींच्या जिन्यात पान खाऊन थुंकणे ही मोठय़ा प्रमाणावर आढळणारी सवय आहे. या थुंकीवर बुरशी वाढते. श्वसनाद्वारे या बुरशीचे कण व्यक्तीच्या शरीरात जातात. त्यामुळे अनेकांना डोके दुखणे, मळमळणे, डोळ्यांना खाज येणे, सकाळी उठल्यावर घसा दुखणे   असे   अ‍ॅलर्जिक   आजार होऊ शकतात.’’   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा