ठाणे पोलिसांनी सार्वजनिक उत्सवांमधील आवाजाची पातळी नियमानुसार ठेवण्याची सक्ती केल्यामुळे शहरातील लाऊडस्पीकर मालक बिथरले असून ठाण्यातील सार्वजनिक उत्सवांसाठी मुंबई, पुण्यातील ठेकेदारांनीही ध्वनिक्षेपक यंत्रणा पुरवू नये, असे आवाहन या मालकांच्या संघटनेने केले आहे. ठाण्यासह राज्यातील जवळपास सर्वच शहरांमध्ये सार्वजनिक उत्सव साजरा करताना ध्वनी प्रदूषणासंबंधीचे सर्व नियम धाब्यावर बसविण्यात येतात. ठाण्यातील प्रमुख चौकांमध्ये तर दहीहंडी, गणेशोत्सवादरम्यान आवाजाची पातळी १०० डेसीबलच्या पुढे सरकते. वर्षांनुवर्षे हा गोंगाट बिनभोबाट सुरू असताना ठाणे पोलिसांनी यंदा मात्र आवाजाची पातळी ओलांडणाऱ्या ध्वनिक्षेपक ठेकेदारांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा निर्णय व्यवहार्य नाही, असा सूर व्यक्त करत लाऊडस्पिकर मालक संघटनेने या निर्णयास विरोध करताना ठाणे शहराबाहेरील इतर ठेकेदारांनीही उत्सवांसाठी ध्वनी यंत्रणा पुरवू नये, असे आवाहन केल्यामुळे उत्सव मंडळांपुढे मात्र मोठा पेच निर्माण झाला आहे.
ध्वनी प्रदूषणासंबंधी न्यायालयाने काही नियम आखून दिले असले तरी प्रमुख शहरांमध्ये ते पाळले जात नाहीत. उत्सवांच्या काळात धांगडिधगा करण्यात ठाणे शहर सर्वात पुढे आहे. महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने नुकत्याच जाहीर केलेल्या एका अहवालात उत्सवांच्या काळात ठाणे सर्वाधिक ध्वनी प्रदूषित शहर असते, अशी भूमिका मांडली आहे. शहरातील सार्वजनिक उत्सवांमध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा सहभाग असतो. दहीहंडी उत्सव साजरा करताना तर शहरातील वेगवेगळ्या चौकांमध्ये ध्वनी प्रदूषणाची पातळी टोक गाठते, असा आजवरचा अनुभव आहे. विशेष म्हणजे, ठाणे महापालिकेने ज्या भागात शांतता क्षेत्राची आखणी केली आहे, तेथेही आवाजाची पातळी वाढलेली दिसून आली आहे. आवाजाची पातळी ओलांडणाऱ्या अशा मंडळांविरोधात तोंडदेखले गुन्हे दाखल करण्यात पोलीस धन्यता मानतात, असा आजवरचा अनुभव आहे. ठाणे पोलिसांच्या सेवेत काही महिन्यांपूर्वी दाखल झालेले सहआयुक्त व्ही.व्ही.लक्ष्मीनारायण यांच्या एका फतव्यामुळे दरवर्षीचा ध्वनी प्रदूषणाचा हा पायंडा यंदा मोडण्याची चिन्हे दिसू लागली असून यामुळे ध्वनिक्षेपक पुरविणारे ठेकेदार आणि पोलीस यंत्रणा आमनेसामने उभी ठाकली आहेत.
उत्सव मंडळे धास्तावली
लक्ष्मीनारायण यांनी ध्वनिक्षेपक ठेकेदारांची एक बैठक बोलावून आवाजाची पातळी वाढू नये, अशा सूचना दिल्या. ही पातळी ओलांडली तर कारवाई करू, असा इशाराही देण्यात आला. पोलिसांचा हा निर्णय अव्यवहार्य असल्याचे ध्वनिक्षेपक मालकांचे म्हणणे असून याविरोधात त्यांची संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आली आहे. हा निर्णय कायम राहिल्यास शहरातील एकाही उत्सव मंडळाला ध्वनिक्षेपक यंत्रणा पुरवली जाणार नाही, असा इशारा लाऊडस्पिकर संघटनेने दिला आहे. हा इशारा देताना एक पाऊल पुढे टाकत या संघटनेने ठाणे शहराबाहेरील इतर ठेकेदारांनीही ठाण्यात ही यंत्रणा पुरवू नये, असे आवाहन केले आहे. पोलीस म्हणतात त्याप्रमाणात आवाजाची पातळी राखणे कुठल्याही ठेकेदाराला व्यवहार्य नाही. ‘ठाण्यात येऊन ध्वनिक्षेपक यंत्रणा बसविल्यास आणि आवाज वाढला तर त्याविरोधात कारवाई करण्यास आम्ही पोलिसांना भाग पाडू’, असा इशारा ठाण्यातील ठेकेदारांनी दिला आहे. त्यामुळे उत्सव साजरा करणारे मंडळे धास्तावली असून ध्वनिक्षेपकाची यंत्रणा उभी कोठून करायची, असा प्रश्न मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना पडला आहे.
नियमांची सक्ती अव्यवहार्य
नियमानुसार आखून दिलेल्या आवाजात लाऊडस्पिकर चालूच शकत नाही. साउंड सिस्टीममध्ये आवाजाची पातळी नियंत्रित करण्याची उपकरणे अस्तित्वात नाही आणि गाण्याच्या पातळीनुसार आवाज वर-खाली होत असतो. त्यामुळे आवाजाच्या पातळीला अशा प्रकारे नियंत्रित करता येतच नाही, असा दावा ठाणे जिल्हा लाऊडस्पिकर मालक संघटनेचे अध्यक्ष दीपक चाफेकर यांनी केला. शहरातील मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये वाहनांच्या आवाजाची पातळी ९० डेसीबलपेक्षा जास्त असते. वेगवेगळ्या पहाण्यांमध्ये हे यापूर्वीच उघड झाले आहे. त्यामुळे ध्वनी प्रदूषणासाठी लाऊडस्पीकरला जबाबदार धरून कसे चालेल, असा सवाल ठाणे जिल्हा लाऊडस्पिकर मालक संघटनेचे उपाध्यक्ष भगवान भोईर यांनी केला. या सक्तीमुळे हा व्यवसाय बंद होईल आणि अनेक जण बेकार होतील. त्यामुळे शेतकऱ्यांपाठोपाठ आम्हाला आत्महत्या कराव्या लागतील, असेही त्यांनी सांगितले.