नक्षलवाद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आत्मसमर्पण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत नक्षलवाद्यांचे पुनर्वसन व संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेण्यास शासन तयार आहे. नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे, अन्यथा पोलीस दल लढाईस केव्हाही तयार आहे, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक मो. सुवेज हक यांनी धानोरा येथे आयोजित जनजागरण मेळाव्यात दिला.
धानोरा पोलीस उपविभागाच्या वतीने धानोरा येथे तीन दिवसीय भव्य जनजागरण मेळावा नुकताच पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उपमहानिरीक्षक ए.पी. सिंग यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक मो. सुवेज हक  होते. यावेळी सीआरपीएफच्या ११३ बटालियनचे कमांडंट, तहसीलदार मल्लिक वीराणी, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर, सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा प्रामुख्याने उपस्थित होते. या मेळाव्याच्या दोन दिवसांपूर्वी धानोरा येथे नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटाच्या धमकीला पोलीस भीक घालत नाही, असेही पोलीस अधीक्षकांनी यावेळी ठणकावून सांगितले. या मेळाव्यात विविध शासकीय विभागांतर्फे योजनांची माहिती देणारे १५ स्टॉल्स लावण्यात आले होते. तत्पूर्वी, पोलीस दलातर्फे रांगोळी, कबड्डी, व्हॉलीबॉल स्पर्धा, तसेच सांस्कृतिक रेला नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतील विजेत्यांना स्मृतिचिन्ह रोख बक्षीस व क्रीडा साहित्य वितरित करण्यात आले. मेळाव्याच्या उद्घाटनाचे प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर यांनी, तर आभार धानोराचे प्रभारी ठाणेदार परघने यांनी मानले. या मेळाव्याला परिसरातील नागरिक उपस्थित होते.
रंगय्यापल्ली येथे जनजागरण मेळावा
गडचिरोली पोलीस दल व जिल्हा प्रशासनाच्या वतीने पोलीस उपविभाग सिरोंचा अंतर्गत दुर्गम अशा रंगय्यापल्ली येथील संत मानवदयाल विद्यालयाच्या पटांगणावर भव्य जनजागरण मेळावा नुकताच पार पडला. उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ताराम राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सिरोंचाचे तहसीलदार श्रीकांत पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी अन्नाबत्तुला, संवर्ग विकास अधिकारी मरसकोल्हे, विद्युत वितरण कंपनीचे उपअभियंता रुद्रशेट्टीवार, सरपंच, उपसरपंच व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष उपस्थित होते. यात शासकीय योजनांची माहिती देणारे १५ स्टॉल्स उभारण्यात आले होते.वनविभागातर्फेअगरबत्ती प्रकल्प उभारण्याबाबत उपस्थितांना माहिती दिली. मेळाव्याला परिसरातील नागरिक उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा