भोकरदन येथे सोमवारी मध्यरात्रीनंतर अडीचच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडणारे दोन चोरटे व पोलिसांत परस्परांवर गोळीबार झाल्याचे थरारनाटय़ घडले. मात्र, या प्रकारात कोणीही जखमी झाले नाही. अंधाराचा फायदा घेत चोरटे पळून गेले.
भोकरदनला सिल्लोड रस्त्यावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे हे एटीएम फोडण्यात येत असल्याचे गस्तीवरील पोलिसांना लक्षात आले. पोलीस आल्याचे लक्षात येताच एटीएम केंद्रातून दोन चोरटय़ांपैकी एकाने पोलिसांवर गावठी रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली. पोलिसांनी ही गोळी चुकवली. त्यानंतर दोन्ही चोरटय़ांनी पलायन केले. या वेळी पोलिसांनीही चोरटय़ांच्या दिशेने गोळीबार केला. परंतु चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले. घटनास्थळी पोलिसांना गावठी रिव्हॉल्व्हर सापडले.
चोरटय़ांनी एटीएम यंत्र वरील बाजूने फोडले होते. परंतु ते पूर्ण फुटले नसल्याने आतील रक्कम सुरक्षित राहिली. पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी मंगळवारी भोकरदनला येऊन घटनास्थळाची पाहणी केली. भगवान नाईक व बी. एम. चौधरी या गस्तीवरील पोलीस शिपायांनी चोरटय़ांचा सामना केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा