शहरातील विद्यार्थिनी, महिलांविरूध्द गैरवर्तन झाल्यास स्वत: पुढे येऊन न घाबरता पोलिसांकडे तक्रार केल्यास त्यांना सर्व प्रकारचे संरक्षण दिले जाईल, अशी ग्वाही देत पोलीस उपनिरीक्षक तृप्ती आठवले यांनी महिलावर्गास दिलासा दिला. सोनसाखळी चोरांपासून तर छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांपर्यंत सर्वाकडून महिला लक्ष्य होत असताना आठवले यांनी दिलेला धीर महिलांची हिंमत वाढविणारा ठरला आहे. येथील रोटरी क्लब व सुराणा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने महिला दिनाच्या पाश्र्वभूमीवर शिवाजीनगरमधील गुरूव्दारात आयोजित कार्यक्रमात वर्षभरातील विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या महिलांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी तृप्ती आठवले, उद्योजिका स्वाती गुजराथी आणि रोटरी क्लबचे ज्येष्ठ सदस्य उपस्थित होते. टीव्ही, इंटरनेट, मोबाईलच्या आजच्या जमान्यात महिलांच्या वाचन संस्कृतीत वाढ व्हावी म्हणून सामान्य ज्ञान स्पर्धेचा उपक्रम गौरवास्पद असल्याचे गुजराथी यांनी नमूद केले. महिलांनी साडय़ा, दागिने, ब्युटीपार्लर आदींवरील खर्चाबरोबरच दर महिन्यास एखादे चांगले पुस्तक विकत घेऊन वाचावे. विज्ञान, आरोग्य, शिक्षण आदींवरील पुस्तके महिलांनी वाचली तर कुटूंब व समाज यांचा विकास होऊन भावी पिढी संस्कारक्षम घडेल असा विश्वास गुजराथी यांनी व्यक्त केला. सामान्य ज्ञान स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या भाग्यश्री दराडे, मृणाल गुजराथी, ज्योती कासार, गौरी जोशी यांसह वर्षभरात विविध क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी बजाविणाऱ्या मोनिका कडनोर, धनश्री पवार, सोनाली काळसर्पे, प्राजक्ता खालकर, निकीता काळे, श्रद्धा माळवतकर, कोमल कांबळे, सिद्धी देशपांडे यांचा रोटरी क्लबतर्फे सत्कार करण्यात आला. रोटरी क्लब अध्यक्षा चंदा डमरे, सचिव चित्रा गुजराथी, मीरा मालते, भारती बोरसे आदींनी या उपक्रमाचे संयोजन केले. सिद्धी देशपांडेच्या गोदावरी वाचवा या विषयावरील वक्तृत्वाने सर्वानाच मंत्रमुग्ध केले. सूत्रसंचालन रवींद्रकौर कांत यांनी केले.