महिलांशी लग्न करून त्यांना गंडविणाऱ्या ठकसेनाची भूमिका असलेला ‘लेडीज व्हर्सेस रिकी बहेल’ हा चित्रपट नुकताच येऊन गेला. पण या काल्पनिक ठकसेनालाही लाजवेल असा एक खराखुरा ठकसेन उजेडात आला आहे. कृष्णराज व्यंकटेश (४२) असे त्याचे नाव असून त्याने सहा महिलांशी लग्न करून त्यांना कोटय़ावधी रुपयांचा गंडा घातला आहे.
आंध्रपदेशातील कृष्णराज व्यंकटेश हा गोव्यातील एका हॉटलेचा मॅनेजर होता. भारदस्त व्यक्तिमत्व, इंग्रजीवर प्रभुत्व हे त्याचे विशेष गुण. या हॉटेलात अनेक उच्चभ्रू कुटुंबे उतरत असत. आपणच या हॉटेलचे मालक असल्याचे भासवून तो त्यांच्यावर छाप पाडत असे. व्यक्तिमत्वाच्या जोरावर त्याने श्रीमंत तरुणींना आपल्या जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली. त्याचे राहणीमान उंची असे. तो कुठेही विमानाने प्रवास करीत असे आणि पंचचारांकित हॉटेलात मुक्काम ठोकत असे. नेहमी ब्रँडेड वस्तू वापरण्यावर त्याचा कटाक्ष असे. त्यामुळे तरुणी त्याच्यावर भाळत असत.
अशा फसवल्या मुली
मुली आपल्यावर भाळत असल्याचे लक्षात आल्यावर कृष्णराजने पुढचा डाव रचला. त्याने केवळ अतिश्रीमंत मुलींनाच लक्ष्य केले. विवाहविषयक संकेतस्थळावरून मुली निवडून त्यांच्यावर आपल्या व्यक्तिमत्वाची छाप पाडीत असे. माझे गोव्याला हॉटेल आहे, अशी थाप मारीत असे. मग त्यांच्याशी लग्न करून दुसरे हॉटेल उभारण्यासाठी मदत म्हणून पैसे घेत असे.
व्यंकटेशने आतापर्यंत अंधेरी, गोवा, बंगळुरु, हैदराबाद, नागपूर  येथील ६ तरुणींशी अशा पद्धतीने लग्न केले आहे. बंगळूर येथील तरुणीकडून त्याने दीड कोटी रुपये घेतले होते. इतर तरुणींकडूनही त्याने २५ लाख ते ५० लाख रुपये उकळले होते. गोव्यातील एका हॉटेल व्यावसायिकाच्या विकलांश मुलीशी त्याने लग्न केले आणि तिच्याकडून तर तब्बल पावणेदोन कोटी रुपये उकळले होते.
अखेर ठकसेन सापडला
गिरगावातील एक कुटुंब काही महिन्यांपूर्वी गोव्याला या हॉटेलमध्ये गेले होते. त्यांच्याशी व्यंकटेशने ओळख वाढवून हे आपले हॉटेल असल्याचे त्यांना भासवले. दोन महिन्यांत त्यांच्याशी घरगुती संबंध प्रस्थापित करून आपण भागीदारीत एक हॉटेल सुरू करू, असे सांगून त्यांच्याकडून ५३ लाख रुपये त्याने घेतले. मात्र नंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी गोव्यात जाऊन तपास केला असता खरा प्रकार उघडकीस आला. पण व्यंकटेश गोव्याहून निसटला होता. त्याचा शोध घेत पोलीस जयपूरला त्याच्या घरी पोहोचले. तेथे त्याची खरी पत्नी, सासू आणि मुले होती. २००१ मध्ये त्याने पहिले लग्न केले होते. या खऱ्या सासूकडूनही त्याने हॉटेल सुरू करण्यासाठी २५ लाख रुपये घेतले होते. याप्रकरणाचा तपास करताना पोलिसांना त्याच्या लग्नाच्या सुरस कथा समजल्या. व्यंकटेशला जयपूरहून डी. बी. मार्ग पोलिसांनी अटक करून मुंबईला आणले.
व्यंकटेश कधी कुठल्या मुलीला हॉटेलचा मालक, कधी अभियंता तर कधी दक्षिणेतील अभिनेता असल्याचे सांगायत असे. आतापर्यंत ६ तरुणींनी विविध पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध फसवणुकीच्या तक्रारी दिल्या आहेत. बुधवारी त्याला अंधेरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांनी दिली.

Story img Loader