सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान काही आपतकालीन परिस्थिती उद्भवल्यास राज्ज परिवहन महामंडळाने पोलिसांशी संपर्क साधण्यासाठी स्वतंत्रपणे संपर्क योजना तयार करून ती पोलीस विभागाच्या योजनेशी सुसंगत राहील यासाठी दोन्ही विभागांनी एकमेकांच्या संपर्कात राहण्याची सूचना राज्य परिवहन विभाग आणि पोलीस अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत करण्यात आली.
२०१५-१६ मध्ये होणाऱ्या सिंहस्थात नाशिकमध्ये येणाऱ्या भाविकांच्या वाहतूक नियोजनासाठी या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक शहराबाहेर आठ ठिकाणी वाहनतळ व्यवस्था करण्यात येणार असून त्या ठिकाणी कोणत्या सुविधा देण्यात येतील यांसह इतर मुद्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. परिवहन व पोलीस विभागात समन्वयासाठी संयुक्त समिती तयार करण्यात आली असून समितीच्या अध्यक्षपदी सहाय्यक पोलीस आयुक्त संजीव ठाकूर हे असून मदतीस पोलीस निरीक्षक बागवान व राज्य परिवहन विभागाचे आगार प्रमुख आर. डी. अहिरे, वाहतूक निरीक्षक व्ही. एस. गणोरे हे राहणार आहेत. परिवहन विभागास अंतर्गत व बाह्य़ वाहनतळावरील गर्दी नियंत्रण करण्यासाठी कशा प्रकारे अडथळ्यांची व्यवस्था  पाहिजे याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागास देण्याविषयी सूचित करण्यात आले.
सिंहस्थात १५०० बसेस वापरण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती परिवहन विभाग अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी ५० लाख भाविकांच्या वाहतुकीसाठी इतक्या बसेस पुरेशा पडतील काय, असा प्रश्न उपस्थित करून यासंदर्भात आढावा घेण्याची सूचना केली. सिंहस्थात कार्यरत बस चालक-वाहकांना शहरातील मार्गाची व इतर बाबींचे प्रशिक्षण देण्याविषयी तसेच त्यांना अन्नाचे पाकीट, पाणी मिळेल याची व्यवस्था करण्याबाबत आयुक्तांनी सूचविले.
बाहेरील राज्यातून व इतर जिल्ह्य़ातून किती बसेस येतील याची आगाऊ माहिती घेऊन ती पोलीस विभागास देण्यात यावी. तसेच गर्दीच्या योग्य नियोजनासाठी परिवहन व पोलीस यांच्या विभागामार्फत संयुक्त नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचाही मुद्दा मांडण्यात आला. शहरात येणाऱ्या मार्गावर बसेस नादुरूस्त झाल्यास त्याठिकाणी क्रेन व इंधन पुरविणाऱ्या वाहनांची व्यवस्था करण्यात यावी, आगारात तसेच बाह्य़ व अंतर्गत वाहन तळावर सीसीटीव्हीची व्यवस्था करणे, बाह्य़ वाहनतळ ते अंतर्गत वाहन तळ यादरम्यान भाविकांची ने-आण करण्याकरिता स्वतंत्र व्यवस्था करणे, बाहेरगावाहून भाविकांची येणारी वाहने आणि परिवहन महामंडळाची वाहने योग्य मार्गाने कशी जातील यासाठी महामार्ग पोलीस विभाग आणि परिवहन महामंडळ यांची संयुक्त बैठक घेणे, पर्वणीचे दिवशी बसेससाठी इंधन पुरविण्याच्या सुविधेसंदर्भात आगाऊ नियोजन करणे, बाह्य़ वाहन तळावरून भाविकांची वाहतूक करण्यासाठी बसेस कमी पडल्यास खासगी वाहनांची व्यवस्था करणे, याविषयी विचारविनिमय या बैठकीत करण्यात आला. बैठकीस सहाय्यक पोलीस आयुक्त पंकज डहाणे, संजीव ठाकूर तसेच परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रण वाय. के. जोशी, विभागीय वाहतूक अधिकारी के. एस. पाटील, आगार प्रमुख एस. ए. शिंदे,े आर. डी. अहिरे तसेच वाहतूक निरीक्षक सिंहस्थ कक्ष व्ही. एस. गणोरे हेही उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा