जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव, जि. प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पावडे व जगन्नाथ भोर यांनी आपली बदनामी केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी, असा तक्रार अर्ज माजी आमदार राजीव राजळे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात आज दिला. त्यामुळे राजळे विरुद्ध पाटील यांच्यातील वादास आज वेगळे वळण लागले.
राजळे हे जि. प. उपाध्यक्ष मोनिका राजळे यांचे पती आहेत. चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई करु नये यासाठी व दबावासाठी राजळे यांनी आपल्याला मोबाईलवरुन दमबाजी करत शिवीगाळ केल्याची तक्रार ८ दिवसांपूर्वी पाटील यांनी ग्रामविकास खात्याच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवून केली होती. राजपत्रित अधिकारी संघटनेनेही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत राजळे यांचा निषेध केला होता व पुन्हा असा प्रकार घडल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
त्यानंतर काही दिवस पाटील किंवा राजळे यांच्याकडून प्रत्यक्ष कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त झाली नाही, मात्र राजळे कसे स्वच्छ चारित्र्याचे आहेत व ते अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणे शक्य नाही, त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यांची बदनामी थांबवावी, अशा मागण्या विविध संघटनांनी प्रशासनाकडे केल्या आहेत. आता राजळे यांनी स्वत: पोलीस ठाण्यात चौघा अधिकाऱ्यांविरुद्ध त्यांनी आपली राजकीय, सामाजिक, शारिरीक व मानसिक बदनामी केली असा तक्रार अर्ज दिला आहे. जाधव हे राजपत्रित अधिकारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष, पावडे सचिव व भोर सदस्य आहेत.
राजळे यांनी तक्रार अर्जात त्यांनी व त्यांचे आजोबा, वडिल व पत्नी यांनी विविध क्षेत्रात केलेल्या कामाची माहिती देऊन म्हटले की, पाटील यांना आपण कोणतेही अपशब्द वापरले नसताना त्यांनी आपली बदनामी करण्यासाठी प्रधान सचिवांकडे खोटय़ा आरोपांची तक्रार केली, तसेच महासंघास हाताशी धरुन खोटे आरोप करुन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले, तसेच त्याच्या प्रती वृत्तपत्रांना दिल्या. त्यामुळे माझी बदनामी झाली. माझ्या नावलौकिकाची मानहानी झाली, याची चौकशी करुन चौघांवर कारवाई करुन आपल्याला न्याय मिळावा.

Story img Loader