‘एएनओ’चे डीआयजी कोण? अनुपकुमार सिन्हा, नागपूर रेंजचे डीआयजी कोण? माहिती नाही, ही उत्तरे आहेत नवागत पोलीस शिपायांची. राज्य पोलीस दलातील नवागत पोलीस शिपायांचा सध्या ‘सीट रिपोर्ट’ तयार केला जात असून याप्रसंगी सामान्य ज्ञान तपासताना आलेली ही उत्तरे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्य पोलीस दलात सध्या सीट रिपोर्ट किंवा रिमार्क लिहिण्याचे काम सुरू आहे. या अहवालासाठी विशिष्ट दिवस ठरवून तशी सूचना तीन-चार दिवस आधीच दिली जाते. पोलीस उपायुक्त पोलीस दलात दाखल होऊन दहा वर्षांहून जास्त कालावधी झालेल्या शिपायांचा, तर सहायक पोलीस आयुक्त दहा वर्षांखालील नोकरी झालेल्यांचा रिपोर्ट तयार करतात. पोलीस निरीक्षक अथवा संबंधित विभाग प्रमुख यावेळी हजर असतात. नोकरीत लागल्यापासून रोज केलेल्या कामाची नोंद प्रत्येक शिपायास एका वहीत करावी लागते. एक नोंदवही तो काम करतो त्या ठिकाणी असते. वरिष्ठ अधिकारी प्रत्येकाला बोलावून त्याची वैयक्तिक आणि खात्यातील नोंद वही तपासतात. त्याची वर्षभरातील वागणूक, कामाची पद्धत, गणवेश, सामान्य ज्ञान आदींची त्याची वैयक्तिक, तसेच खात्यातील नोंदवहीत केली जाते. त्याला मिळालेले पुरस्कार आणि शिक्षा याचीही त्यात नोंद असते. राज्य पोलीस दलात पोलीस महासंचालकांपासून उपनिरीक्षकाला दरवर्षी गोपनीय अहवाल लिहावा लागतो. त्याखालील कर्मचाऱ्यांचा सीट रिपोर्ट तयार केला जातो.
राज्यभरात सध्या सीट रिपोर्ट तयार करण्याचे काम सुरू आहे. नवागत पोलीस शिपायांच्या सामान्य ज्ञान तपासणीप्रसंगी झालेली प्रश्नोत्तरे धक्कादायक असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. राज्याचे गृह राज्यमंत्री कोण? आर. आर. पाटील, एमएलए व एमएलसीत फरक- एमएलसी म्हणजे अपघातात किंवा जाणूनबुजून केलेला जखमी, एमएलए व एमएलसी आमदार आहेत. मात्र, ते कुठल्या सदनात बसतात? माहिती नाही, ५०४, ५११ ही कलमे केव्हा लावतात, ३०४ व ३०५ कलमांमधील फरक कोणता? नासुप्रचे सभापती कोण- संजय दराडे, राज्यसभेचे सभापती कोण? माहिती नाही, नागपूरचे खासदार कोण? माहिती नाही, शिवाजीराव मोघे यांच्याकडे कुठले खाते आहे? माहिती नाही, नागपुरात कुठले मंत्री राहतात? माहिती नाही, आयआरएसचा फुल फॉर्म काय? माहिती नाही. ही उत्तरे पदवीधर व उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेची तयारी करीत असलेल्या शिपायांची आहेत. आर.आर. उपाख्य आबा पोलीस दलात लोकप्रिय असले तरी शिपायांचे हे ज्ञान पाहता त्यांच्या निरंतर प्रशिक्षणासाठी ते काय करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यासंदर्भात सहायक पोलीस आयुक्त सुनील जयस्वाल म्हणाले, सामान्य ज्ञानापेक्षाही नोकरीत दैनंदिन कामाची विशेषत: पंचनामा वगैरे कामाची माहिती असायलाच हवी, पण व्यक्तीपरत्वे प्रमाण कमी-जास्त असू शकते. सहायक पोलीस आयुक्त गंगाराम साखरकर म्हणाले, केवळ नवागत पोलीस शिपाईच नव्हे, तर प्रत्येक व्यक्तीचे सामान्य ज्ञान आणि तो ज्या ठिकाणी काम करतो त्या कामाची सखोल माहिती त्याला असणे आवश्यकच आहे. अधिकाऱ्याने त्याच्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी प्रयत्न केले पाहिजे, या मताशी त्यांनी सहमती व्यक्त केली. त्यांच्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांच्या सर्वसामान्य ज्ञान वृद्धीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बहुतांश नवागत शिपायांचे सर्वसामान्य ज्ञान, कायद्याचे आणि प्रत्यक्ष कामाचे ज्ञान परिपूर्ण नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शिपाई सकाळी अथवा रात्री कामावर गेल्यानंतर त्याला एकतर बंदोबस्त अथवा गस्त यातच व्यस्त रहावे लागते. असे असले तरी सामान्य ज्ञान परिपूर्ण नसले तरी अद्ययावत ठेवणे, ही सर्वस्वी त्याचीच गरज असते, असे मत सेवानिवृत्त सहपोलीस आयुक्त बाबासाहेब कंगाले यांनी व्यक्त केले. या दलात आल्यानंतर प्रत्यक्ष प्रशिक्षणात या सर्व विषयांचा अंतर्भाव असतो. प्रशिक्षणानंतरही निरंतर प्रशिक्षण त्याला दिले जातेच. मानसिक ताण, मानवी हक्क, संविधान, तसेच प्रचलित कायदे आदींची माहिती त्यात असते. तरीही त्याला जुजबी माहिती नसली तर त्याचा अर्थ त्याची इच्छा नसेल, तो कच्चा असेल तसेच तो लक्ष देत नाही, असा होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा