पिस्तूल हाताळताना त्यातील गोळी सुटून एक शिपाई ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. अजनीमधील रेल्वे पोलीस मुख्यालयात बुधवारी दुपारी सव्वाबारा वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली.
राजेश भागडीकर (रा. महाल) हे ठार झालेल्या तर एकनाथ लहूरकर हे जखमी पोलीस शिपायाचे नाव आहे. नागपूरच्या रेल्वे स्थानकावर काही दिवसांपूर्वी रेल्वे पोलिसांनी १३४ किलो गांजा जप्त केला होता. त्यातील प्रमुख आरोपी टुण्णा हा ओरिसात असल्याचे समजल्यानंतर रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे एक पथक ओरिसा येथे गेले होते. त्यात राजेश भागडीकरसह आणखी चार-पाच जण होते. त्यातील दोघा शिपायांजवळ शस्त्र होते. आरोपीस घेऊन हे पहाटे नागपुरात आले. आरोपीस कोठडीत टाकल्यानंतर राजेशह दोन शिपायांची डय़ुटी संपल्याने शस्त्र जमा करावयास सांगण्यात आले होते. त्यानुसार राजेशसह दोघे शिपाई अजनीमधील रेल्वे पोलीस मुख्यालयात आले. पश्चिमेकडील मुख्य इमारतीत असलेल्या शस्त्रागारात हे दोघे गेले.
शस्त्रागारात एकनाथ लहुकर हा तैनात होता. राजेशने त्याच्याजवळील ९ एमएम पिस्तूल एकनाथजवळ दिले. एकनाथने मॅक्झिन (गोळ्या पेटी) काढून बाजूला ठेवली आणि पिस्तूल तपासू लागला. तेवढय़ात पिस्तुलाचा घोडा (ट्रिगर) दाबला गेल्याने अचानक गोळी निघाली. ती एकनाथच्या हातातून आरपार निघून समोरच उभ्या राजेशच्या पोटात शिरली. गोळी पिस्तुलातून बाहेर पडताना गोळीचा आवाज इमारतीत घुमल्याने इमारत परिसरात असलेले निवडक शिपाई शस्त्रागाराच्या दिशेने धावले. त्यांनी लगेचच दुसऱ्या इमारतीत असलेल्या इतर शिपायांना बोलावून घेतले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. एका रुग्णवाहिकेतून या दोघांना लगेचच ऑरेंज सिटी रुग्णालयात
नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी राजेशला तपासून मृत घोषित केले. गंभीर जखमी एकनाथवर
अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले.
या घटनेने रेल्वे वर्तुळात खळबळ उडाली. रेल्वे पोलिसांच्या नागपूर जिल्ह्य़ाचे प्रभारी अधीक्षक शशीकांत माने, परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त चंद्रकिशोर मीणा, सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक एल. जी. डुंबरे यांच्यासह अजनी पोलीस, रेल्वे पोलीस अधिकारी व शिपाई तेथे पोहोचले. त्यांनी घटनास्थळाचे निरीक्षण करून घटनेची माहिती जाणून घेतली. अजनी पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद घेत तपास सुरू केला.   
या घटनेमुळे भागडीकर व लहूरकर कुटुंबीय हादरले. राजेश भागडीकर माजी सैनिक असून २०१० मध्ये रेल्वे पोलीसमध्ये भरती झाला होता. त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुलगे आहेत. त्याच्या पत्नीच्या हृदयावर दोनवेळा शस्त्रक्रिया
झाल्या असून कुटुंबात तो एकटात कमावता होता. त्याच्या काकांचे चौदा दिवसांपूर्वी निधन झाले. सर्व
कुटुंबीय चौदावीच्या कार्यक्रमात
होते. या घटनेची माहिती समजल्यानंतर त्यांच्यावर शोककळा पसरली. ते सर्व ऑरेंज सिटी रुग्णालयात पोहोचले. त्यांना शोकावेग आवरत नव्हता.
रेल्वे पोलीस मुख्यालयातील दुसरी घटना
रेल्वे पोलीस मुख्यालयातील गोळी सुटल्याची गेल्या काही वर्षांतील ही दुसरी घटना आहे. २४ फेब्रुवारी २००९ रोजी रेल्वेचे तत्कालीन पोलीस अधीक्षक एम. यू. कर्जतकर  यांनी स्वत:च्या कानशिलात पिस्तुलातून गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. ज्या कक्षात ही घटना घडली तो कक्ष शस्त्रागाराशेजारी आहे. मध्यरात्री बारा ते सव्वाबाराच्या दरम्यान ही घटना घडली होती. आजची घटनाही दुपारी सव्वाबारा वाजताच्या सुमारास घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा