महाविद्यालयीन वर्चस्वातून गोळीबार करणाऱ्या दोघा आरोपींना रविवारी न्यायालयाने पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. युद्धवीर मानसिंग गायकवाड (वय १८, रा. ताराबाई पार्क) व उत्कर्ष उदयशंकर घाटगे (वय १८, रा. उत्तरेश्वर पेठ) अशी त्यांची नावे आहेत. या दोघांना शनिवारी रात्री बेळगाव येथे अटक करण्यात आली.
विवेकानंद कॉलेज व न्यू कॉलेज या कॉलेजमधील महाविद्यालयीन वर्चस्वातून विद्यार्थ्यांमध्ये वाद आहे. यातूनच न्यू कॉलेजमध्ये शिकणाऱ्या प्रसाद सुजित चव्हाण (वय १९, रा. शिवाजी पेठ) याच्यावर युद्धवीर गायकवाड याने दोन दिवसांपूर्वी अदिती कॉर्नर येथे गोळीबार केला होता. कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष मानसिंग गायकवाड यांचा युद्धवीर हा मुलगा आहे. तर शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रामभाऊ चव्हाण यांचा प्रसाद हा नातू आहे. गोळीबाराच्या प्रकारानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये प्रसाद चव्हाण याने फिर्याद दिली होती. मात्र याच दिवशी मानसिंग गायकवाड व रामभाऊ चव्हाण यांनी गोळीबाराचा प्रकार हा आमचा वैयक्तिक मामला आहे, तो आपापसात मिटवून घेऊ असे वक्तव्य केले होते. त्यामुळे गोळीबारातील आरोपींवर कारवाई होणार का? याविषयी साशंकता निर्माण झाली होती. गोळीबाराचा प्रकार झाल्यानंतर युद्धवीर गायकवाड, उत्कर्ष घाटगे व त्यांचा एक अल्पवयीन मित्र फरारी झाले होते. त्यांचे मोबाईल बंद होते. शाहूपुरी पोलिसांच्या पथकाने शनिवारी रात्री बेळगाव येथे युद्धवीर, उत्कर्ष व अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. त्यांच्याकडे रिव्हॉल्व्हर, फायरिंग नंतरच्या चार पुंगळय़ा मिळाल्या. गुन्हय़ात वापरलेली रिव्हॉल्व्हर ही युद्धवीरचे आजोबा माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड यांची असल्याचे युद्धवीरने प्राथमिक तपासात सांगितले आहे. वैयक्तिक रिव्हॉल्व्हरचा गैरवापर केल्याने त्याचा परवाना रद्द व्हावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल पाठविण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा