नोकरीचे आमिष दाखवून पाच जणांची सुमारे तीन लाख १५ हजार रूपयांची फसवणूक केल्याबद्दल विजय आकाराम माने (रा. साळशिरंबे, ता. खानापूर) यास अटक झाली. त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याप्रकरणी कृष्णत बाबूराव आडके (रा. शिवनगर) यांनी तक्रार दिली आहे. आडके यांच्यासह अन्य पाच जणांचीही फसवणूक झाल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. संबंधितांनी संशयितास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची चर्चा आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिवनगर येथील कृष्णत आडके यास आरोग्य खात्यात नोकरीस लावतो असे सांगून त्याच्याकडून विजय माने याने ६६ हजार रूपये घेतले होते. त्याशिवाय गोवारे येथील जावेद मुल्ला यांच्याकडून एक लाख २५ हजार रूपये, शेणोली येथील मुबारक निजाम मुजावर यांच्याकडून ३५ हजार रूपये, शिवनगर येथील भरत महादेव सुतार यांच्याकडून ४३ हजार रूपये व किल्ले मच्छिंद्रगड येथील अजित सोपान साळुंखे यांच्याकडून ६६ हजार रूपये उकळले होते. या सगळय़ांनी माने याने नोकरीच्या आमिषाने फसविल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Story img Loader