* ६५ लाखाचे लाच प्रकरण
* पोलीस निरीक्षकाची बदली
* वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही होणार चौकशी
पुण्याच्या समृद्ध जीवन कंपनीची चौकशी थांबविण्यासाठी तब्बल ६५ लाख रूपयांची लाच स्वीकारणाऱ्या चाळीसगावच्या बिपिनचंद्र तिवारी या पोलीस कर्मचाऱ्याची न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत रवानगी केली. या प्रकरणी निरीक्षक लक्ष्मण गायकवाड यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी करण्यात आली आहे तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर संशयाची सुई स्थिरावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अटक झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याकडे प्रचंड मालमत्ता असल्याचेही उघड झाले आहे.
चाळीसगाव शहरात चार वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांना ६० लाखाच्या खंडणी प्रकरणी अटक करण्यात आली होती. माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. उत्तम महाजन यांना डांबून ठेवत खंडणी मागितल्याचा त्यांच्यावर आरोप होता. चाळीसगाव शहरात लाहोर प्रकरणाची आठवण करून देणारी दुसरी लाचखोरीची घटना घडली असून रंगेहात पकडल्या गेलेल्या पोलीस नाईक तिवारीने हे काम आपले नसून आपण तर वरिष्ठांच्या हातातील बाहुले आहोत, अशी कबुली दिल्याने या प्रकरणातही निरीक्षकासह पोलीस उपअधीक्षकाचा सहभाग आहे काय, हे चौकशीअंती स्पष्ट होणार आहे.
जिल्हा पोलीस दलाची मानहानी करणाऱ्या या घटनेनंतर तिवारीला पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आले आहे. तर निरीक्षक लक्ष्मण गायकवाड यांचीही या प्रकरणी चौकशी करण्यात येईल, असे अधीक्षक एस. जयकुमार यांनी म्हटले आहे. चाळीसगाव येथील रविंद्र लांडगे यांनी समृद्ध जीवन कंपनी विरोधात चाळीसगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. कंपनी शेतकऱ्यांची फसवणूक करते असे त्यांचे म्हणणे आहे. त्या अनुषंगाने चौकशी होणे आवश्यक होते. तथापि, चाळीसगाव पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी तपास व कंपनीच्या चौकशीस टाळाटाळ केल्यानंतर तक्रारदाराने पोलीस अधीक्षकांकडेही दाद मागितली होती. त्यानंतर अधीक्षकांनी उपनिरीक्षक खंबायत यांच्यावर या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी सोपविली होती. पुढे खंबायत यांनी तिवारीला कंपनीची चौकशी करण्याचे सुचविले होते. कंपनीचे व्यवस्थापक महेंद्र गाडे यांच्याकडे चौकशी थांबविण्यासाठी तिवारीने तब्बल एक कोटी रुपयांची मागणी केली होती. अखेर ६५ लाखात हा व्यवहार ठरला. मात्र, तत्पुर्वीच गाडे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर पुढील नियोजित घटनाक्रम पार पडला आणि तिवारी गजाआड गेला. मुळचा धरणगावच्या पोलिसाचा मुलगा असलेल्या बिपीन तिवारीने आपल्या १८ वर्षांच्या पोलीस सेवेत कोटय़वधीची मालमत्ता आपल्या व पत्नीच्या नांवे घेतल्याची माहिती पुढे आली आहे.
बिपीन तिवारीला पोलीस कोठडी
पुण्याच्या समृद्ध जीवन कंपनीची चौकशी थांबविण्यासाठी तब्बल ६५ लाख रूपयांची लाच स्वीकारणाऱ्या चाळीसगावच्या बिपिनचंद्र तिवारी या पोलीस कर्मचाऱ्याची न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत रवानगी केली.
First published on: 01-02-2013 at 12:29 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police custody to bipin tiwari