शहरातील दोन वकिलांच्या घरफोडीसह अन्य गुन्हय़ांतील मुख्य आरोपी पंचाक्षरी ऊर्फ जेम्स ऊर्फ चिंप्या संगय्या स्वामी (वय २५, रा. रेल्वे क्वार्टर, मोदीखाना, सोलापूर) यास दीड वर्षांनंतर अटक करण्यात आली असून, त्यास आठ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. विशेष म्हणजे पंचाक्षरीच्या टोळीला एका पोलीस हवालदाराची साथ होती.
मुरारजी पेठेतील श्रद्धा टेरेस येथे राहणारे अ‍ॅड. रवींद्र वसंतराव पाटील यांची १४ ऑक्टोबर २०११ रोजी घरफोडी होऊन त्यात रोख रक्कम व ६० तोळे सोन्याचे दागिने असा मिळून १२ लाखांचा ऐवज लांबवण्यात आला होता. तत्पूर्वी, एसटी बसस्थानकाजवळ धरमसीलाइनमध्ये राहणारे अ‍ॅड. विनोद सूर्यवंशी यांचीही घरफोडी होऊन त्यात चोरटय़ांनी १३ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले होते. या गुन्हय़ाचा तपास करून पोलिसांनी जवाहर गदाळे व मनोज बाळगे या दोघांना संशयित म्हणून अटक केली होती. या प्रकरणाशी शहर गुन्हे शाखेत त्या वेळी नेमणुकीस असलेल्या पोलीस हवालदार मकसूद कुडले याचाही संबंध असल्याचे आढळून आले होते. कुडले हा शिवछत्रपती रंगभवनाजवळील एका लॉजमध्ये या घरफोडीतील चोरटय़ांची राहण्याची व्यवस्था करीत असे. याच ठिकाणी चोरून आणलेल्या मालाची वाटणी होत असे. त्यामुळे कुडले यास नंतर अटक करून त्यास निलंबित करण्यात आले होते. दरम्यान, पोलिसांनी गदाळे व बाळगे यांच्याकडून घरफोडीच्या गुन्हय़ातील ९ लाख ३ हजार रुपये किमतीचे ३६ तोळे सोने हस्तगत केले होते. पाचजणांच्या या टोळीचा प्रमुख पंचाक्षरी स्वामी हा मात्र अद्याप सापडत नव्हता. त्यास अलीकडे पाच महिन्यांपूर्वी मुंबई पोलिसांनी मुंबईतील घरफोडीप्रकरणी अटक केली होती. तेथील न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर पंचाक्षरी स्वामी यास सोलापूर शहर पोलिसांच्या हवाली करण्यात आले. पंचाक्षरी स्वामी हा पूर्वी बॉक्सिंग खेळात तरबेज असून त्यास अनेक बक्षिसे मिळाली आहेत. नंतर त्याचे पाय गुन्हेगारीकडे वळले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा