खासगी सावकारीप्रकरणी कराड तालुका पोलिसांनी चौघांना अटक केली. याबाबत कराडनजीकच्या कार्वे येथील उमेश दिनकर कळंत्रे यांनी कराड तालुका पोलिसांत फिर्याद दिली होती.
अमन आयुब पालकर (रा. गुरुवार पेठ, कराड), बालाजी ऊर्फ बाळू सारंग (रा. गवारे, ता. कराड), संजय राजाराम ढेब (रा. शुक्रवार पेठ, कराड), प्रशांत तुकाराम थोरात (रा. कार्वे, ता. कराड) अशी प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की कार्वे येथील उमेश कळंत्रे यांचा दूध डेअरीचा व्यवसाय आहे. काही वर्षांपूर्वी हा व्यवसाय वाढविण्यासाठी त्यांना पैशांची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी प्रशांत थोरात याच्यासह अमन पालकर, बालाजी सारंग, संजय ढेब यांच्याकडून १० टक्के व्याजदराने कर्जाऊ रक्कम घेतली. गत सात ते आठ वर्षांत त्यांनी त्या रकमेची परतफेडही केली. मात्र, व्याजापोटी २० लाख रुपये दे, असा तगादा आरोपींनी उमेश कळंत्रे यांच्यापाठीमागे लावला होता. रात्री-अपरात्री ते घरी घेऊन पैशाची मागणी करीत होते. तसेच वारंवार फोनवरूनही पैशाची मागणी केली गेली. पैशांसाठी मारहाण करण्याची धमकीही त्यांच्याकडून देण्यात येत होती.
या मानसिक त्रासाला कंटाळून उमेश कळंत्रे यांनी याबाबतची फिर्याद कराड तालुका पोलिसात दिली. त्यानुसार या चार जणांवर खासगी सावकारीबाबत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. सहायक निरीक्षक अशोक चौधरी अधिक तपास करीत आहेत.

Story img Loader