महिलांच्या लैंगीक छळप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेले माजी आमदार लक्ष्मण माने यांना आज चौथ्या गुन्ह्य़ात न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान माने आणि या कृत्यात त्यांना मदत करणाऱ्या मनीषा गुरव यांचा अटकपूर्व जामीनसाठीचा अंतिम अर्जही न्यायालयाने फेटाळला.
साताऱ्यातील शारदाबाई पवार आश्रमशाळेतील सहा महिला कर्मचाऱ्यांनी माने यांच्याविरुद्ध लैंगीक अत्याचार केल्याची तक्रार दाखल केलेली आहे. याप्रकरणी एकेका गुन्ह्य़ात माने यांना अटक करून तपास केला जात आहे. ९ एप्रिलपासून लक्ष्मण माने पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांना आत्तापर्यंत तीन गुन्ह्य़ात वेगवेगळ्या वेळी ताब्यात घेण्यात आले होते. आज त्यांना चौथ्या गुन्ह्य़ात पुन्हा अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्या गुन्ह्य़ाचा तपास पोलीस उपअधीक्षक मनोज पाटील करत आहेत.
दरम्यान, मानेंची सहकारी मनीषा गुरव व लक्ष्मण माने यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने आज फेटाळून लावला. मनीषा गुरव या आजपर्यंत पोलिसांना सापडलेल्या नाहीत. त्यामुळे तपास कामासाठी मनीषा गुरवला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न आहेत.