पाटण तालुक्यातील कोंजवडे येथे शालेय पोषण आहारातील धान्य चोरण्याचा प्रयत्न करणा-या उत्तम नारायण जाधव (रा. तारळे, ता. पाटण) या मुख्याध्यापकास ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडले. शिक्षणविस्तार अधिका-यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उंब्रज पोलिसात संबंधित मुख्याध्यापकावर चोरीचा गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी उत्तम जाधव यांना अटक केली असून, पाटण येथील न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
    उत्तम जाधव याच्याकडून जप्त करण्यात आलेला तांदूळ, तूरडाळ, मसूरडाळ हे धान्य दहा हजार रुपये किमतीचे आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उंब्रज पोलीस ठाण्याचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक अरुण देवकर करत आहेत. जाधव हे  कोंडवडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक असून, शाळेस प्रत्येक महिन्याला पोषण आहाराचे धान्य प्राप्त होत होते. हे धान्य महिन्याच्या कालावधीत संपत नव्हते. मात्र, मुख्याध्यापक जाधव संबंधित धान्य संपल्याचे कागदोपत्री वरिष्ठांना दाखवत असे. प्रत्यक्षात शिल्लक धान्य ते शाळेतच एका ठिकाणी साठवून ठेवत. अनेक महिने हा प्रकार सुरू होता. सध्या शाळेला उन्हाळी सुटी असताना रात्री दहाच्या सुमारास एक टेम्पो (एमएच ११ एजी ४८८५) शाळेच्या आवारात उभा असल्याचे व त्यात पोती भरली जात असल्याचे ग्रामस्थांना दिसले. ग्रामस्थांनी तेथे जाऊन पाहिले असता मुख्याध्यापक जाधव शाळेतून धान्याची पोती टेम्पोमध्ये भरत होते. ग्रामस्थांनी विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. ग्रामस्थांनी तारळे विभागाचे शिक्षण विस्तार अधिकरी विश्वनाथ चव्हाण यांना ही माहिती दिली. त्यांनी खातरजमा करून उंब्रज पोलिसात फिर्याद दिली. फिर्यादीवरून जाधव यांच्यावर चोरीचा गुन्हा नोंदविला आहे.

Story img Loader