व्यवसायासाठी माहेरून दहा लाख रुपये आणावेत या कारणावरून नवविवाहितेचा छळ व मारहाण करून विनयभंग केल्याप्रकरणी येथील पेालीस ठाण्यात श्रीरामपूर शहरातील प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या कुटुंबातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
राहाता शहरातील व्यापारी महावीर मदनलाल पिपाडा यांची मुलगी नेहा नीतेश कोठारी हिने राहाता पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की पतीच्या व्यवसायासाठी माहेरून १० लाख रुपये आणावेत यासाठी सासरी छळ सुरू होता. पती नीतेश, सासरा अनिल, दीर आकाश व सासू साधना कोठारी हे शिवीगाळ दमदाटी करून शारीरिक व मानसिक छळ करीत होते. दि. ११ सप्टेंबर १३ला सासरे अनिल कोठारी यांनी माझा विनयभंग केला. त्याचा जाब विचारला असता लग्नाच्या वेळी माहेरून आणलेले चाळीस तोळय़ांचे दागिने माझ्याकडून काढून घेऊन घरातून हाकलून दिले.
अलीकडेच गेल्या दि. ३०ला आरोपींनी माहेरी राहाता येथे येऊन घरात अनाधिकाराने प्रवेश करून मला व माझ्या आई-वडिलांना शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली. नेहा कोठारी यांच्या या फिर्यादीनुसार चौघांविरुद्ध येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेहा हिचा पती नीतेश, सासरा अनिल व दीर आकाश या तिघांना राहाता पोलिसांनी अटक केली असून, त्यांना न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा