बीड जिल्हा सहकारी बँकेच्या वडवणी शाखेत ४ कोटी ३७ लाख ९० हजार रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक अरुण कुलकर्णी, वसंत सानप व नागेश हन्नूरकर या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात आतापर्यंत जवळपास ८० जणांना अटक करण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतल्यामुळे त्यांची अटक त्या वेळी टळली होती.जिल्हा बँकेतील विविध घोटाळे लेखा परीक्षणातून उघड झाले. वडवणी शाखेच्या लेखा परीक्षणात २००९ ते २०११ दरम्यान ४ कोटी ३७ लाख ९० हजार रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आला. कर्जमंजुरी दिली नसतानाही बँकेतील अधिकाऱ्यांनी १८ संस्थांच्या १६४ सदस्यांना बनावट कर्जवाटप केले. यात कर्जदारांची कागदपत्रेही बनावट होती. या प्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात ८० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यातील काहींना अटक करून जामिनावर सोडण्यात आले. मात्र, या गैरव्यवहारात बँकेचे तत्कालीन मुख्य व्यवस्थापक अरुण कुलकर्णी, कर्ज शाखेचे व्यवस्थापक वसंत सानप व नागेश हन्नुरकर यांचाही सहभाग उघड झाला. मात्र, त्यांनी न्यायालयात धाव घेतल्यामुळे त्यांच्यावर पोलीस कारवाई झाली नव्हती.

Story img Loader