विज्ञान, जेईई, नेट यांसारख्या परीक्षांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सरस्वती एज्युकेशन सेंटर नावाचा खासगी शिकवणी वर्ग काढून त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून साडे तीन लाख रुपयांचे शुल्क घेतले. मात्र, वर्षभरात विद्यार्थ्यांना काही न शिकवता शिकवणी वर्ग बंद करणाऱ्या दोन खासगी शिकवणीचालकांस विष्णुनगर पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. या दोघांना न्यायालयाने ११ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
जयंत तांबे-नांदगावकर (वय २५), अभिजीत गावडे (वय २४) अशी अटक केलेल्या खासगी क्लासचालकांची नावे आहेत. डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावर हा शिकवणी वर्ग सुरू होता. या शिकवणी वर्गात कोपरमध्ये राहणारे विद्याधर सरणकर यांनी मुलीच्या अभ्यासक्रमासाठी ५६ हजार रुपये गेल्या वर्षी भरले होते. वर्षभर क्लास सुरू होता. त्यानंतर जयंत तांबे याने हा शिकवणी वर्ग अभिजीतकडे हस्तांतरित केला. त्याने काहीही न शिकवता हे वर्ग बंद केले. सरणकर यांनी तांबेकडे शुल्क परत करण्याची मागणी केली. त्यांना रत्नाकर बँकेचा ३० हजाराचा धनादेश दिला. तो वटला नाही. अनेक पालकांना हा अनुभव आल्यानंतर विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण घाडगे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Story img Loader